पुणे – नेहमीच दुर्लक्षीत झालेल्या महिलांचे प्रश्न समजून घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबविल्या. त्यांच्या प्रश्नांवर ठोस महायुती सरकारने निर्णय घेतले. त्यामुळेच राज्यात पहिल्यांदाच महिलांची मतपेढी तयार झाली आहे, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी युवासेना सचिव किरण साळी, महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत उपस्थित होत्या.
डॉ. गोर्हे म्हणाल्या, महिला बचत गट, शहरांकडे होणारे स्थलांतर, रोजगार हमी, शिक्षणाचे वाढते प्रमाण तसेच महिलांचा सन्मान वाढविणार्या विविध योजनांमुळे महिलांना महिलांचा हक्क मिळत आहे. त्यांनाही त्यांच्या अधिकारांची जाणीव झाली आहे. त्यामुळेच यावेळी महिलांची पतपेढी तयार झाली. लाडकी बहिण योजनामुळे वातावरण बदलले आहे. ही योजना निवडणुक चेंजर ठरणार आहे.
एकमेकांविषयी बोलताना कोणी अपशब्द वापरल्यास त्यावर निवडणुक आयोग त्याची दखल घेत आहे. ही चांगली गोष्ट आहे. खरे तर कोणाविषयी बोलताना आपल्या तोंडून अपशब्द निघणार नाहीत, याची प्रत्येकांनी काळजी घेतली पाहिजे. चौथे महिला धोरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे येणार्या निवडणूकीत महिला उमेदवारांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार असल्याचेही डॉ. नीलम गोर्हे यांनी सांगितले.