नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांपैकी तब्बल एक तृतीयांश चेहरे हे पुर्णपणे नवीन आहेत. या नव्या चेहेऱ्यांमध्ये अमित शहा आणि माजी विदेश सचिव एस जयशंकर यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात रमेश पोखरियाल आणि अर्जून मुंडा या दोन माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश करण्यात आला असून हे दोघेही पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. नवीन चेहेऱ्यांपैकी सहा केंद्रीय मंत्री आणि तेरा राज्यमंत्री आहेत.
एस जयशंकर हे संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सध्या सदस्य नाहीत. मात्र त्यांना लवकरच राज्यसभा सदस्यत्वाची संधी दिली जाईल. भाजपचे प्रल्हाद जोशी आणि शिवसेनेचे अरविंद सावंत हेही पहिल्यांदाच कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले आहेत. अनुराग ठाकूर, बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय, केरळचे माजी प्रदेश भाजप अध्यक्ष व्ही मुरलीधरन, यांचाहीं प्रथमच केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाला आहे. भाजपच्या अन्य नवीन चेहऱ्यांमध्ये सुरेश अंगाडी (कर्नाटक), रतनलाल कटारिया (हरियाना), रेणुका सिंग सरूता (छत्तीसगड), सोम प्रकाश (पंजाब ), रमेश तेली (आसाम), प्रतापचंद्र सारंगी (ओडिशा), कैलाश चौधरी (राजस्थान), आणि देबश्री चौधरी (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील 57 सदस्यांचा कालच शपथविधी झाला आहे.