नवी दिल्ली -जगातील अनेक देशांप्रमाणे करोना संकटाशी झुंजत असलेल्या भारतात बुधवारी एक सकारात्मक घडामोड घडली. देशात प्रथमच सक्रिय बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची अधिक संख्या नोंदली गेली.
मंगळवार सकाळपासून 24 तासांतील करोनाविषयक स्थितीचा आढावा घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशाला दिलासा देणारी आकडेवारी सादर केली. त्यानुसार, देशातील करोनाबाधितांची संख्या 2 लाख 76 हजारांवर पोहचली आहे. त्यामध्ये सक्रिय बाधितांची संख्या 1 लाख 33 हजार 632 इतकी आहे. तर आतापर्यंत 1 लाख 35 हजार 205 बाधित करोनामुक्त झाले आहेत. देशात करोनाचा संसर्ग झालेले रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 49 टक्क्यांजवळ पोहचले आहे. संबंधित 24 तासांत देशभरात सुमारे 6 हजार बाधित करोनामुक्त झाले. देशभरात घेण्यात आलेल्या करोनाविषयक चाचण्यांनी 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
देशात दिलासादायक घडामोडी घडत असल्या तरी करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेचे सावट कायम आहे. देशात नव्याने 9 हजार 985 करोनाबाधितांची भर पडली. देशात सलग सहाव्या दिवशी 9 हजार 500 पेक्षा अधिक बाधित वाढले. त्याशिवाय, जून महिन्यातील प्रत्येक दिवशी करोना संसर्गाने देशात 200 हून अधिक बाधितांचा बळी घेण्याचे सत्र कायम राहिले. मंगळवार सकाळपासून 24 तासांत देशात आणखी 279 बाधित दगावले. देशात सर्वांधिक करोनाबाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.