पुणे – गेल्या आठ महिन्यांपासून शहरात थैमान घालणाऱ्या करोनाच्या साथीचा जोर चांगलाच ओसरला आहे. सोमवारी शहरात 133 नवीन बाधित रूग्ण आढळले असून गेल्या सहा महिन्यांतील हा सर्वात कमी आकडा आहे.
या पूर्वी मे महिन्यात 130 पेक्षा कमी रूग्ण आढळून येत होते. दिवसभरात 15 मृत्युची नोंद झाली. जुलै, ऑगस्ट तसेच सप्टेंबर मध्ये दरदिवशी सरासरी 1800 ते दोन हजारपेक्षा नवीन बाधित रूग्ण सापडत होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयापासूनच करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा उतरणीला लागला होता.
त्यानंतर संशयित रूग्णांच्या चाचण्याही 6 ते 7 हजारांवरून 50 ते 60 टक्के कमी होत आता प्रतीदिन अडीच ते तीन हजारांवर आले आहेत. तर नव्याने बाधित रूग्णांचा आकडाही घटण्यास सुरूवात झाली आहे. मागील दोन आठवडे हा आकडा अडीचशें ते तीनशे प्रतिदिन होता. हा आकडा सोमवारी थेट 133 पर्यंत खाली आला आहे.
दरम्यान, सोमवारी दिवसभरात 154 जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर 546 रुग्ण अत्यवस्थ असून, त्यातील 324 रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.