पुसेगाव -पुसेगाव, ता. खटाव येथे दरवर्षी जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाला यंदा कोविडच्या निर्बंधांमुळे “ब्रेक’ लागला आहे. “एक गाव एक दुर्गा’ उपक्रम येथे प्रथमच राबविण्यात येणार आहे. उत्सवात होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन गावातील सर्व मंडळांकडून येथील कोविड केअर सेंटरला अडीच लाख रुपये किमतीच्या ऑक्सिजन मशीन्स भेट देण्यात येणार आहेत.
पुसेगावमधील 14 मंडळे नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा करतात. मंडळांकडून नऊ दिवस सादर होणाऱ्या कार्यक्रमांना महिला व ग्रामस्थ हजेरी लावतात. दुर्गा विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असते. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण येतो. यंदा करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गावातील नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी पुसेगाव पोलीस ठाण्यात बैठक झाली.
यावर्षी “एक गाव एक दुर्गा’ उपक्रम राबविण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला, उत्सवात होणारा लाखो रुपयांचा खर्च टाळून कोविड केअर सेंटरला दहा ऑक्सिजन मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी सेवागिरी मंदिरात एकाच दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून मठाधिपती प. पू. सुंदरगिरी महाराज हे संपूर्ण नवरात्रात पूजाअर्चा करणार आहेत. बैठकीस जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, सपोनि विश्वजित घोडके, रणधीर जाधव, सुनीलशेठ जाधव, बाळासाहेब जाधव, विकास जाधव, बाबू जाधव, सूरज जाधव, चंद्रकांत जाधव उपस्थित होते.