मुंबई – भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामाला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला प्रथमच मुंबई संघात स्थान मिळाले आहे.
बीसीसीआयने संघांत 22 जणांना सहभागी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने अष्टपैलू अर्जुनला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे मुंबईच्या वरिष्ठ संघात निवड होण्याची अर्जुनची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती सलील अंकोला यांनी दिली.
अर्जुनने काही दिवसांपूर्वी मुंबई खेळाडूंदरम्यान झालेल्या 4 सराव सामन्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच 7 धावा केल्या होत्या. याआधी अर्जुनने विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच 19 वर्षांखालील भारतीय संघाकडूनही तो कसोटी सामने खेळला आहे. याशिवाय त्याने अनेकदा भारत आणि इंग्लंड संघाच्या नेटमध्ये गोलंदाजी केली आहे.
दरम्यान, सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. तर आदित्य तरे उपकर्णधार असेल. या संघात यशस्वी जयस्वाल, धवल कुलकर्णी, शिवम दुबे, सर्फराज खान, सिद्धेश लाड असे आघाडीचे खेळाडूही आहेत.