पुणे : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवपदी पहिल्यांदाच महिला न्यायाधीशांची निवड झाली आहे. मंगल कश्यप असे त्यांचे नाव असून, त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. पूर्वीचे सचिव न्यायाधीश प्रताप सावंत यांची बदली झाल्यानंतर कश्यप यांची नियुक्ती करण्यात आली.
विशेषत: दिवाणी दावे तडजोडीतून निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्व प्रलंबित, तसेच दाखलपूर्व दावे निकाली काढण्यासाठी लोकअदालत व प्राधिकरणाच्या इतर उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यास विधी विद्यालय आणि सामाजिक संस्थांची मदत घेतली जाईल. कायद्याची सर्वसामान्यांमध्ये जागृती होण्यासाठी भर दिला जाणार असल्याचे कश्यप यांनी म्हटले.
कश्यप यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली आहे. तर कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी सायबर कायद्यात डिप्लोमा केला आहे. सध्या त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवाद कायद्यात पीएच.डी. करत आहेत. 2007 साली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती नगर येथे झाली होती. त्यांनी मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयात सहायक धर्मादाय आयुक्त म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर 2018 मध्ये परभणी येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली होती. सध्या त्या पुणे येथे कार्यरत आहेत.