विशेष रेल्वेने प्रथमच मिरच्यांचे पार्सल बांग्लादेशला रवाना

नवी दिल्ली – रेल्वेच्या इतिहासात प्रथमच देशाच्या सीमापार करत आंध्रप्रदेशातील, गुंटूर जिल्ह्यातील रेड्डीपालेम येथून बांग्लादेशातील बेनापोल येथे विशेष मालगाडीद्वारे सुक्‍या मिरच्या पाठविण्यात आल्या. आंध्रप्रदेशातील गुंटूर आणि आसपासचा भाग सुक्‍या मिरच्यांसाठी प्रसिद्ध आहे. या क्रुषी उत्पादनाची विशिष्ट चव आणि दर्जा यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या प्रसिद्ध आहेत. पूर्वी गुंटूर आणि आसपासच्या भागातील शेतकरी आणि व्यापारी थोड्या प्रमाणात सुक्‍या मिरच्या, रस्तामार्गे बांग्लादेशला पाठवत आणि त्यासाठी 7000 रुपये प्रति टन इतका खर्च येत असे.

मात्र, टाळेबंदीमुळे रस्तावाहतुकीने हे अत्यावश्‍यक उत्पादन पाठवणे शक्‍य नव्हते. रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांनी संबंधितांशी संपर्क करत रेल्वेने माल पाठवण्याच्या सुविधेची माहिती दिली. त्याप्रमाणे त्यांनी सुक्‍या मिरच्या एकत्रित रेल्वे मालगाडीने पाठविल्या. रेल्वेच्या मालवाहतूकीद्वारे माल पोचविण्यासाठी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात एकत्रितपणे माल म्हणजे एका खेपेस 1500 टन इतका पाठविणे अनिवार्य आहे.

हा प्रश्न सोडविण्यासाठी आणि रेल्वेने माल पोचवणाऱ्यांना कमी प्रमाणात म्हणजे जास्तीत जास्त 500 टन माल एकावेळी पाठवता यावा यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या गुंटूर शाखेने पुढाकार घेऊन हा माल एका विशेष एक्‍सप्रेस पार्सल सेवेद्वारे बांग्लादेशात पाठवला. यामुळे गुंटूर येथील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या बाजारपेठेतील सुक्‍या मिरच्यांची वाहतूक लहान प्रमाणात रेल्वेच्या विशेष एक्‍सप्रेस पार्सलने देशाच्या सीमापार पाठवणे शक्‍य झाले.

त्यानुसार, 16 मालडब्यांची एक विशेष पार्सल रेल्वे बांग्लादेशातील बेनापोल येथे पाठवली. एका पार्सल मालडब्यात 19.9 टन वजनाच्या 466 सुक्‍या मिरच्यांच्या पिशव्या, असा एकूण 384 टन इतका माल, विशेष पार्सल एक्‍सप्रेसने पाठवण्यात आला. अशाप्रकारे विशेष पार्सल एक्‍सप्रेसने माल पाठवण्यासाठी 4,608 रुपये प्रति टन इतका खर्च आला. रस्ता वाहतुकीसाठी येणाऱ्याच्या 7000 रुपये प्रती टन खर्चाच्या तुलनेत, स्वस्त ठरला.

कोविड काळात, भारतीय रेल्वेने पार्सल वाहतूकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना हाती घेतल्या आहेत. वैद्यकीय वस्तू आणि उपकरणे, अन्न अशा अत्यावश्‍यक सेवा-वस्तूंचा पुरवठा लहान पार्सल आकारात व्यावसायिक उपयोगासाठी आणि वापरण्यासाठी पाठवणे गरजेचे होते. ही अत्यावश्‍यक वस्तूंची गरज पूर्ण करण्यासाठी रेल्वेने जलद वाहतुकीसाठी राज्य सरकारे आणि ई-कॉमर्स कंपन्यांना रेल्वेगाड्या उपलब्ध करुन दिल्या. निवडक मार्गांवर वेळापत्राकनुसार विशेष पार्सल रेल्वे धावत आहेत. 22 मार्च पासून 11 जुलै पर्यंत ,एकूण 4434 पार्सल रेल्वे गाड्यांपैकी 4,304 गाड्या ह्या वेळापत्रकानुसार धावल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.