‘त्या’ माणसासाठी मोदी सरकारने गालिचे अंथरणे म्हणजे गांधी, सरदार पटेलांचा अपमान

शिवसेनेनं अमेरिकेतील हिंसाचारावरून मोदींवर साधला निशाणा

मुंबई – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत जो बायडेन यांचा विजय झाल्यावर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी संसदेच्या परिसरात अभूतपूर्व गोंधळ घातला आणि पोलिसांबरोबर त्यांचा जोरदार हिंसाचारही झाला. यावर आज शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाष्य केले आहे.

शिवसेनेने म्हंटले कि, अमेरिकेच्या लोकशाहीचे पुरते वस्त्रहरण झाले आहे. अमेरिका कालपर्यंत जगाला लोकशाही आणि मानवतेचे धडे देत होती. त्याच अमेरिकेतही लोकशाही तकलादू आहे व त्या देशातही प्रे. ट्रम्पसारखे सत्तापिपासू लोक आहेत हे जगाने पाहिले.

अमेरिकेच्या संसदेत जो हिंसाचार घडला त्याबद्दल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीव दुःख व्यक्त केले आहे. आमच्या पंतप्रधानांची वेदना समजून घेतली पाहिजे; पण या भयंकर ट्रम्पच्या गळ्यात गळे घालून कालपर्यंत जगातले अनेक राज्यकर्ते फिरत होते. इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन हे तर प्रे. ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळायला हवा असे सांगत जगभर फिरत होते. या शांततेच्या पुतळ्याने भाडोत्री गुंड लोकशाहीच्या मंदिरात घुसवून अतिरेकी कारवायाच केल्या. 

याच ट्रम्प यांच्या उपस्थितीत ‘हाऊ डू मोदी’सारखे सोहळे अमेरिकेत पार पडले. ते कमी पडले म्हणून आपल्या अहमदाबादेत 50 लाख लोकांना जमवून ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाची सलामी देण्यात आली. ट्रम्प यांचे वर्तन व बोलणे हे सुसंस्कृत माणसासारखे कधीच नव्हते. त्यांचा सार्वजनिक वावर हा शिसारी आणणाराच होता. अशा माणसासाठी मोदी सरकारने अहमदाबादेत लाल गालिचे अंथरले होते. हा समस्त गुजराती बांधवांचा, गांधी, सरदार पटेलांचाच अपमान आहे, अशा शब्दात शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 

बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रास लागले नाहीत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पंतप्रधान मोदी यांनी गुजरातेत नेऊन मिरवले. त्या चिनी राष्ट्राध्यक्षाने आता लडाखमध्ये त्यांचे सैन्य घुसवले. ट्रम्प यांना अहमदाबादेत नेले, त्यांनी येताना करोना आणला व आता लोकशाहीची सरळ हत्याच केली. आमचे परराष्ट्र धोरण हे प्रवाहपतित होत आहे. भुलभुलैयाच्या मोहात पडून नुकसान करून घेत आहे. त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. 

दुस्थानातील लोकशाहीकडून अमेरिका, ब्रिटनने धडे घ्यायला हवेत. निवडणुकीत पराभव होताच इंदिराजी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग अशा प्रत्येक नेत्याने शांतपणे सत्तेचे हस्तांतरण केले आहे. उद्या मोदींचा पराभव लोकशाही मार्गाने झाला तर तेसुद्धा त्याच परंपरेचे पालन करतील. म्हणून प्रिय मित्र असूनही ट्रम्प यांच्या झुंडशाहीचा धिक्कार पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. 

अमेरिका व हिंदुस्थानच्या लोकशाहीत साम्यस्थळे नाहीत. विसंगतीच जास्त आहे. आमच्याकडे निवडणुकांत पराभव होऊ नये यासाठीच हिंसाचार, धर्मद्वेषाचे राजकारण पेटवले जाते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना हतबल केले की त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची वेळच येत नाही. प्रे. ट्रम्प हे आमच्या देशात येऊन काय शिकले? अमेरिकेच्या संसदेत जे घडले ते जगात कोणत्याही देशात घडू नये. पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल, असेही शिवसेनेने म्हंटले आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.