मुंबई – अभिनेत्री उर्फी जावेद हीच्या कपड्यांवरुन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आणि दिवसेंदिवस हे प्रकरण खूपच चिघळत चालले आहे. मात्र, चित्रा वाघ यांच्या मागणीला भीक न घालता उलट उर्फीनेच त्यांच्यावर ट्विट हल्ला चढवला असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, नुकतंच एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने चित्रा वाघ यांना एक विचित्र प्रश्न विचारला असून, त्यावर चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहे. हा प्रश्न उर्फी जावेद हिच्याशी संबधित होता.
“उद्या उर्फी जावेद भाजपमध्येच आली तर? काय कराल’. असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या. “असल्या नंगट लोकांसाठी भाजपामध्ये जागा नाही. तुम्हाला काय वाटतं… भाजपामध्ये लोक एका ध्येयासाठी काम करतात. या विषयाचा मजाक बनवू नका. आमच्यावर बोलतात, टीका करतात तेवढं ठिक आहे. पण आमच्या पक्षावर बोलू नका…” यावेळी चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या होत्या.
दरम्यान, अभिनेत्री, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करणारी अभिनेत्री ‘उर्फी जावेद’ ही तिच्या हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी ही अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला त्यामुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक करतात. इंस्टाग्रामवर तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स असून, उर्फी नेहमीच आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.