सोशल मीडिया मोटिव्हेशनसाठी

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा असून आजकालच्या जमान्यातील तरुण आपल्या आयुष्यात आवश्‍यक असणाऱ्या सर्वच गोष्टी ऑनलाईन शोधू पाहत आहेत. अशा या सर्वच गोष्टी ऑनलाईन शोधणाऱ्या आजकालच्या या टेक्‍नोसॅव्ही तरुणाईला मोटिव्हेशनल स्पीकर्सने भलतीच भुरळ पाडली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आपल्या रोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींवर मात करण्याची प्रेरणा शोधणाऱ्या तरुणाईला असे मोटिव्हेशनल स्पीकर्स आशेचा किरण वाटू लागले आहेत. फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम या सोशल माध्यमांची सैर केल्यास अशा मोटिव्हेशनल स्पीकर्सची भलीमोठी जंत्रीच आपल्याला सापडेल. या मोटिव्हेशनल स्पीकर्सनेदेखील आपापले स्पेशलायझेशन्स निवडले असून ब्रेकअप झाल्यास अमुक स्पीकरचा युट्युब चॅनल, बॉडी बनवण्यासाठीच्या इन्स्पिरेशनसाठी तमुक स्पीकरचे फेसबुक पेज अशी वर्गवारी झाल्याचे पाहायला मिळते. यातील काही मोजके मोटिव्हेशनल स्पीकर्स आज आपल्या भेटीला घेऊन आलोय…

गौर गोपाल दास
गौर गोपाल दास यांची थोडक्‍यात ओळख करून द्यायची असेल तर त्यांना मॉडर्न जमान्याचे आधुनिक संत म्हणता येईल. कपाळावर गंध, अंगात भगवी कपडे परिधान केलेले गौर गोपाल दास समोर आयपॅड ठेऊन इंग्रजी भाषेत प्रभावी प्रवचन देतात. फेसबुकवर त्यांचे 4 मिलियन फॉलोअर्स असून त्यांचे मोटिव्हेशनल व्हिडीओ लाखो लोक बघत असतात. गौर गोपाल दास यांची जगभरामध्ये लाईफ कोच अशी ओळख आहे.

जय शेट्टी
मूळचा भारतीय वंशाचा असलेला जय हा युकेचा नागरिक आहे. जयने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर भारतामध्ये येऊन साधू बनण्याचा निर्णय घेतला होता, त्याने सलग 3 वर्ष भारतीय अध्यात्माचा अभ्यास करून नंतर लोकांना प्रेरित करण्याच्या हेतूने आपला युट्युब चॅनल सुरू केला. जयच्या अध्यात्मातील ज्ञानामुळे त्याच्या व्हडिओजना इंटरनेटवर प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. आज जयच्या युट्युब चॅनलला 2.5 मिलियन लोकांनी लाईक केले असून त्याची गणना जगातील सर्वोत्तम वक्‍त्यांमध्ये होते. इंटरनेटच्या दुनियेमध्ये जय शेट्टीची ओळख आधुनिक जमान्यातला संत अशी आहे.

रिचर्ड विलियम्स
रिचर्ड विलियम्स हा देखील एक आघाडीचा मोटिव्हेशनल स्पीकर असून त्याला प्रिन्स इए या नावाने ओळखले जाते. सुरुवातीला हिप-हॉप संगीतामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या रिचर्डने भगवत गीतेसारख्या अनेक प्राचीन ग्रंथांमधून प्रेरणा घेत लोकांना इन्स्पायर करण्याचा निर्णय घेतला. आज रिचर्ड हा एक यशस्वी वक्‍ता असून त्याच्या फेसबुक पेजला जवळपास 10 मिलियन लोक फॉलो करतात. रिचर्ड छोट्या छोट्या व्हिडीओजच्या माध्यमातून काळजाला भिडणारे संदेश देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

झाकीर खान
मूळचा स्टॅंडअप कॉमेडियन असलेल्या झाकीर खानकडे अनेक तरुण आज मोटिव्हेशन म्हणून पाहतात. आपल्या अनोख्या शायरीतून थेट मनाला साद घालण्यामध्ये झाकीर माहीर आहे. त्याची हसता हसता दुःख सांगणारी अदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडते. खासकरून झाकीर त्याच्या आयुष्यात झालेला प्रेमभंग या विषयावर विनोदी अंगाने बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे.

द रॉक
मूळचा प्रोफेशनल रेसलर असलेल्या डॉवेन जॉन्सन अर्थात द रॉकने हॉलीवूडमध्ये आपले बस्तान चांगलेच जमवले आहेत. रॉक जेवढा एक यशस्वी हॉलिवूड अभिनेता म्हणून ओळखला जातो तेवढाच तो मोटिव्हेटर म्हणून देखील ओळखला जातो. आपल्या अधिकृत फेसबुकच्या माध्यमातून रॉक आपल्या असंख्य चाहत्यांना एक्‍सरसाइज, हेल्दी डायटसाठी मोटिव्हेशन देताना दिसतो.

– प्रशांत शिंदे

Leave A Reply

Your email address will not be published.