पिंपरी – महापालिका निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणी जोरात सुरू आहे. आत्तापर्यंत चिंचवड, पिंपरी आणि भोसरी अशा तिन्ही मतदारसंघात मिळून शुक्रवार अखेर (दि. 3) एकूण 57 हजार 603 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर, नाव वगळण्यासाठी 971 अर्ज आले आहेत.
पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणी जोरात सुरू आहे. आत्तापर्यंत चिंचवड, पिंपरी आणि भोसरी अशा तिन्ही मतदारसंघात मिळून शुक्रवार अखेर (दि. 3) एकूण 57 हजार 603 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर, नाव वगळण्यासाठी 971 अर्ज आले आहेत.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी सध्या विधानसभा निहाय मतदारनोंदणी सुरू आहे. 1 नोव्हेंबरपासून ही मोहीम सुरू झाली. 30 नोव्हेंबरपर्यंत त्यासाठी मुदत होती. राज्य निवडणूक आयोगाने त्यामध्ये 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
आत्तापर्यंत नवमतदार नोंदणीसाठी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तिन्ही मतदारसंघांचे मिळून एकूण 57 हजार 603 अर्ज आले आहेत. नाव वगळण्यासाठी एकूण 971 अर्ज आले आहेत. नाव, जन्म दिनांक, पत्ता, वय, लिंग आदींमधील दुरुस्तीसाठी 2 हजार 291 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर, मतदार संघ अंतर्गत स्थलांतरासाठी 1 हजार 999 अर्ज मिळाले आहेत.
महापालिकेची प्रभाग रचना 6 डिसेंबरपर्यंत जाहीर होणार आहे. त्यानंतर निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होईल. प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांना निवडणूक आचारसंहितेची प्रतीक्षा असणार आहे. त्याशिवाय, पक्षनिहाय उमेदवार निश्चिती, किती जागा लढवायच्या, युती किंवा आघाडीचे धोरण ठरणार आहे. त्यामध्ये ज्या इच्छुक उमेदवारांना राजकीय पक्षांकडून संधी मिळणार नाही, असे उमेदवार अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
नवमतदार नोंदणी पडणार पथ्यावर
महापालिकेची निवडणूक ही 2011 च्या जनगणनेनुसार होत आहे. या निवडणुकीत 46 प्रभागांतून 139 नगरसेवक निवडले जाणार आहेत. 45 प्रभागात प्रत्येकी 3 नगरसेवक तर, एका प्रभागात 4 नगरसेवक असे गणित असणार आहे. नवमतदार नोंदणीमुळे मतदारांची संख्या वाढणार आहे. पर्यायाने, आपोआपच मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल. त्यामुळे नवमतदार नोंदणी ही इच्छुक उमेदवारांच्या पथ्यावर पडणार आहे.