शैक्षणिक संस्थांच्या उपाययोजनांसाठी विद्यापीठाचा पुढाकार

संस्थांच्या अडचणीवरील अभ्यासासाठी समिती नियुक्‍त

पुणे – करोनाच्या प्रादुर्भावामुळे विनाअनुदानित महाविद्यालये व संस्थांची स्थिती बिकट बनली आहे. अशा संस्थांना अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजनांचे धोरण निश्‍चित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सहा सदस्यांची समिती नेमली आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शैक्षणिक संस्थांना पाठबळ मिळण्याची चिन्हे आहेत.

प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे हे समितीचे अध्यक्ष असतील. तर जाधवर इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. सुधाकर जाधवर, तसेच डॉ. एस. पी. लवांडे, प्राचार्य रवींद्र परदेशी, डॉ. प्रमोद गोऱ्हे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय बोरमाणे हे समितीचे सदस्य आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने शैक्षणिक संस्थांना परिपत्रक पाठवून, त्यांना येणाऱ्या अडचणी, सूचना मागविले आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे विनाअनुदानित शिक्षणसंस्थांपुढे विविध प्रकारच्या अडचणी असून, त्याचा अभ्यास समितीतर्फे केला जाणार आहे. त्यावर उपाययोजना करून धोरण निश्‍चित केले जाणार आहे. शैक्षणिक संस्थांनी सूचना व सर्व माहिती विद्यापीठाच्या  approval@unipune.ac.in या इ-मेलवर तसेच टपाल अथवा समक्ष दि. 18 डिसेंबरपर्यंत पाठवावेत, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.