पिंपरी -पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) करिता 350 इलेक्ट्रीक बस (ई-बस) खरेदी करण्यात येणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यातील 62 बस खरेदीसाठी पिंपरी महापालिकेच्या हिश्याचे 31 कोटी रुपये पीएमपीला देण्यास स्थायी समितीच्या सभेत बुधवारी (दि.6) मान्यता देण्यात आली.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर या दोन्ही शहरातील नागरिकांना सक्षम व अधिक चांगली वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर परिवहन उपक्रम या दोन्ही उपक्रमांचे एकत्रीकरण करून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. या कंपनीची स्थापना केली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेकडून पीएमपीला अनुदान देण्यात येते.
पीएमपी 350 ई-बस खरेदी करणार आहेत. त्यापैकी पिंपरी महापालिकेच्या हिश्श्याच्या 140 बस आहेत. प्रतिबसला 50 लाख रुपये सबसिडी आहे. त्यानुसार पालिकेस 70 कोटी रुपयांचा निधी पीएमपीला द्यावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 62 बस खरेदी करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी 31 कोटी रुपयांचा खर्च आहे. तो निधी 31 मार्चपूर्वी महामंडळास अदा करण्याची विनंती पीएमपी प्रशासनाने केली होती. बस खरेदीकरिता 70 कोटी रुपयांची तरतूद होती. त्यातून 31 कोटी रुपये पीएमपीएमएलला देण्यास मान्यता देण्यात आली.