जगभरातील क्रीडापटूंना ते स्वतः खेळत असलेल्या खेळाव्यतिरीक्त अन्य खेळांचीही आवड असते. काही खेळाडू तर अन्य खेळातही तरबेज असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेट व्यतिरीक्त टेनिस व गोल्फही अत्यंत अफलातून पद्धतीने खेळतो. आता तर भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री चक्क क्रिकेटचे धडे गिरवताना दिसून आला. ते देखील बीसीसीआयच्या एनसीएत (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी).
जागतिक स्टार फुटबॉलपटू असलेला छेत्री यापूर्वीही अनेकदा देशातील विविध क्रिकेट मैदानांवर विराट कोहलीसह क्रिकेट खेळण्याचा आनंद घेताना पाहिला गेला आहे. मात्र, ते केवळ आवड असल्याचे दिसत होते. मात्र, गेले काही दिवस ईशान्य भारतातील काही खेळाडूंसह एनसीएमध्ये छेत्री क्षेत्ररक्षणासह चेंडू फेक, गोलंदाजी आणि फलंदाजीचेही धडे गिरवताना दिसला. खुद्द बीसीसीआयनेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
एनसीएचे प्रमुख व भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासह त्याने फुटबॉलचा खेळ, त्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी नवोदित खेळाडूंशी शेअर केल्या. याच खेळाडूंसह त्याने क्रिकेटही खेळले. आता प्रश्न हा उरतो की जे केवळ आगामी स्पर्धांसाठी फुटबॉल मार्केटिंग आहे का खरेच छेत्रीला क्रिकेटचे वेड लागले आहे. छेत्री एनसीएच्या जवळच राहातो. त्यामुळे तो तिथे येतो असे पूर्वी सांगितले जात होते. मात्र, कधीतरी भेट देणे वेगळे व प्रत्यक्ष अकादमीतील खेळाडूंसह खेळणे वेगळे.
सध्या अकादमीत रणजी तसेच अन्य देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंचे सराव शिबिर सुरु आहे. यात खरेतर बाहेरच्या व्यक्तीला सहभागी होता येत नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू असलेल्या छेत्रीला ही परवानगी दिली गेली. छेत्री हा कोहलीचा खुप चांगला मित्र आहे. या दोघांनी गेल्या वर्षीही दिल्लीतील मैदानावरचा फोटो पोस्ट केला होता.
जवळपास सव्वाशे सामने भारताकडून फुटबॉल खेळत छेत्रीने ख्रिस्तियानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सी यांच्यानंतर सर्वात जास्त 80 गोल केले आहेत. मात्र, त्याचा जन्म भारताव्यतिरीक्त अन्य कोणत्याही देशात झाला असता तर आज तो रोनाल्डो व मेस्सी इतकाच प्रसिद्ध झाला असता. कदाचित भारतीयांनी क्रिकेटसह फुटबॉलवरही प्रेम करावे, हेच सुतोवाच करण्यासाठी त्याने अकादमीत क्रिकेटचे धडे गिरवले असावेत.