आयपीएलच्या धर्तीवर फुटबॉल स्पर्धा

नवी दिल्ली – भारतीय फुटबॉलमध्ये प्रगती व्हावी व स्टार खेळाडूंसह खेळताना नवनवीन गोष्टी भारतीय फुटबॉलपटूंना आत्मसात करता याव्यात यासाठी भारतीय फुटबॉल महासंघ एक नवी संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीच आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्याच धर्तीवर राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारतीय वंशाच्या परदेशी खेळाडूंना तसेच जगभरातल परदेशी स्टार खेळाडूंनाही खेळवले जाणार आहे.भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनीच हे संकेत दिले आहेत.

दुबईत नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात भारताला अमिरातीकडून 6-0 असा पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तान आणि बांगलादेशसारख्या प्रतिस्पर्धी संघांनी परदेशातील खेळाडूंचा समावेश करण्यास परवानगी दिली आहे. अफगाणिस्तान संघात सध्या युरोपियन लीगमध्ये खेळत असलेले 13 खेळाडू राष्ट्रीय संघाकडून खेळत आहेत.

जर्मनी, पोलंड, फिनलॅंड, नेदरलॅंड्‌स आणि स्वीडन या देशांमध्ये ते लीग फुटबॉल खेळत आहेत. इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) अपयशी ठरलेल्या एकही खेळाडूला या मैत्रीपूर्ण लढतीत संधी देण्यात आलेली नव्हती. सुमार कामगिरीमुळे राहुल भेके, सेरिटन फर्नांडेस, आशीष राय, ब्रॅंडन फर्नांडेस, अब्दुल सहल, उदांता सिंग आणि कर्णधार सुनील छेत्री यांच्या अनुपस्थित अमिरातीविरुद्धचा सामना खेळला गेला. आता जून महिन्यात होणाऱ्या आणखी काही मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी आम्ही यापैकी नवोदित खेळाडूंना संधी देणार आहोत.

भारतीय वंशाचे काही खेळाडू सध्या विविध देशांच्या संघांकडून खेळत आहेत. त्यांनाही राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत खेळण्यासाठी आमंत्रण देण्यात येणार आहे. त्याच बरोबर परदेशातील विविध लीगमध्ये अनेक नवोदित परंतू गुणवान खेळाडू खेळत आहेत. त्यांनाही राष्ट्रीय स्पर्धेत विविध संघांकडून खेळवण्याचा विचार सुरू आहे. या खेळाडूंमुळे देशातील युवा खेळाडूंना खूप काही शिकता येइल व त्यातूनच भारतीय फुटबॉलचीही प्रगती होइल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.