फुटबाॅल : जुवेंट्‌स तोरिनो सामना बरोबरीत

नवी दिल्ली – ख्रिस्तियानो रोनाल्डोने अखेरच्या क्षणी “हेडर’द्वारे केलेल्या गोलच्या बळावर युव्हेंटसने सेरी ए फुटबॉल स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात तोरिनोला 1-1 असे बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे पुढील वर्षांच्या चॅम्पियन्स लीगसाठी पात्र होण्याच्या तोरिनोच्या आशा धुसर झाल्या आहेत.

17व्या मिनिटाला युव्हेंटसच्या मिरालेम जॅनिचने आपल्या संघातील खेळाडूला चेंडू सोपवण्याऐवजी तोरिनोचा आक्रमणपटू सासा लुकीचकडे सोपवला. त्याची ही चूक युव्हेंटसला महागात पडली व 18व्या मिनिटाला लुकीचने तोरिनोसाठी पहिला गोल नोंदवत सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवली. यानंतर युव्हेंटसच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्यासाठी कडवा संघर्ष केला, परंतु पहिल्या सत्रात तोरिनोला 1-0 अशी आघाडी कायम राखण्यात यश आले.

मध्यंतरानंतरदेखील पहिला गोल करण्यासाठी युव्हेंटसच्या खेळाडूंचे प्रयत्न सुरू राहिले. हा सामना जिंकून तोरिनो धक्‍कादायक विजयाची नोंद करणार असे वाटत असतानाच अनुभवी रोनाल्डोने दोन बचावपटूंना भेदत त्याने उंचावरून आलेल्या चेंडूला गोलजाळ्याच्या दिशेने “हेडर’ लगावून तोरिनोचा गोलरक्षक सॅल्व्हाटोर सिरिगूला चकवले व युव्हेंटसला सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधून दिली.

या बरोबरीनंतर गुणतालिकेच्या पहिल्या स्थानी विराजमान असणाऱ्या युव्हेंटसचे 35 सामन्यांतून 28 विजय, दोन पराभव व पाच बरोबरींसह 89 गुण झाले असून दुसऱ्या क्रमांकावरील नापोलीपेक्षा (70) ते 19 गुणांनी पुढे आहेत. त्यामुळे त्यांचे विजेतेपद जवळपास निश्‍चित झाले आहे. तोरिनो मात्र 35 सामन्यांतून 57 गुणांसह सहाव्या स्थानी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.