मॅंचेस्टर – इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत एव्हर्टन संघाने धक्कादायक निकाल नोंदवताना बलाढ्य चेल्सीचा 1-0 असा पराभव केला. या पराभवामुळे सलग 17 सामने जिंकलेल्या चेल्सीची विजयी घोडदौड संपुष्टात आली आहे.
करोनाचा धोका कमी झाल्यामुळे या सामन्यासाठी 2 हजार प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. या सामन्यात एव्हर्टनच्या जेल्फी सुगर्डससनने 22 व्या मिनिटाला गोल केला व संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिला हाफ संपेपर्यंत चेल्सीला बरोबरी करता आली नाही. दुसरा हाफ सुरु झाल्यावरही त्यांचे गोल करण्याचे सर्व प्रयत्न एव्हर्टनने फोल ठरवले.
यावेळी चेल्सीच्या आक्रमक खेळाला एव्हर्टनने तशाच पद्धतीने उत्तर दिले. चेल्सीला या सामन्यात तब्बल सहा कॉर्नर मिळाले होते. मात्र, त्यातील एकाचेही त्यांना गोलमध्ये रुपांतर करता आले नाही व इथेच त्यांचा पराभव निश्चित झाला होता.
अर्थात, या पराभवानंतरही चेल्सीचे गुणतालिकेतील तिसरे स्थान 22 गुणांसह कायम राहिले असून एव्हर्टनने या विजयासह 20 गुणांची नोंद करत सातव्या स्थानावर उडी घेतली आहे.