केसरी करंडक फुटबॉल स्पर्धा : ब्लु स्टॅग, नवमहाराष्ट्र संघांचे विजय

पुणे -ब्लु स्टॅग, नवमहाराष्ट्र, शिवाजीयन्स अ, डेक्कन 11 क या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.

यावेळी, रुपाली स्पोर्टस क्‍लब विरुद्ध ब्लु स्टॅग या सामन्यात रुपाली स्पोर्टस क्‍लब संघाच्या संग्राम सातव याने 33व्या मिनीटाला सामन्याचा पहिला गोल केला. त्याला उत्तर देताना ब्लु स्टॅग संघाच्या अजित जाधव याने 55व्या मिनीटाला गोल करत संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यामुळे हा सामना टायब्रेकरमध्ये गेला. त्यानंतर रुपाली स्पोर्टस क्‍लब संघाच्या शुभम पोडघन याने 1 गोल केला. तर ब्लु स्टॅग संघाकडून अजित जाधव, सचीन मंडल, प्रतिक मिश्रा यांनी प्रत्येकी 1 गोल केले.

व्होबा ब विरुद्ध नवमहाराष्ट्र यांच्यात झालेल्या सामन्यात व्होबा ब संघाच्या राजन जहागीरदार याने 34व्या मिनीटाला पहिला गोल केला तर त्याला उत्तर देताना नवमहाराष्ट्र संघाच्या दिपक साखरे याने 44व्या मिनीटाला गोल करत 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर टायब्रेकरमध्ये व्होबा ब संघाच्या जेरमी रॉड्रीक्‍स, डॅनियल फर्नांडीस, रेयाल चोलो यांनी प्रत्येकी 1 गोल केले. तर दुसरीकडे नवमहाराष्ट्र संघाच्या शिवम शिंदे, मुनिकेश गुप्ता, दीपक साखरे, होनाजी मुरकुटे यांनी प्रत्येकी 1 असे गोल केले. त्यामुळे 5-4 अशा अंतिम गोल फरकाने नवमहाराष्ट्र फुटबॉल संघाने सामना जिंकला.

यु.के.एम.बी संघ विरुद्ध शिवाजीयन्स अ फुटबॉल संघात झालेल्या सामन्यात शिवाजीयन्स अ संघाच्या बॉगमोनचाई याने 13व्या मिनीटाला पहिला गोल केला. तर किनिश, आयुष शट्टी, सोनू यांनी गोल करत संघाला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्यांच्या खेळाडूंनी आपला गोल धडाका कायम राखला. त्यांच्या मनीषसिंग याने 58व्या मिनीटाला आणि आर्यन सिंग याने 60व्या मिनीटाला गोल करत सामना 7-0 असा शिवाजीयन्स अ संघाच्या नावावर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.