इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : ब्लास्टर्स-एटीके लढत बरोबरीत

कोची: हिरो इंडियन सुपर लिगला (आयएसएल) प्रदिर्घ ब्रेकनंतर सनसनाटी सुरवात झाली. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर यजमान केरळा ब्लास्टर्स एफसी आणि एटीके यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली. दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेने पाच मिनिटे बाकी असताना स्पेनच्या एदू गार्सिया याच्या गोलच्या जोरावर खाते उघडले होते, पण स्लोव्हेनियाच्या मॅटेज पॉप्लॅटनिक याने दोन मिनिटे बाकी असताना ब्लास्टर्सला बरोबरी साधून दिली.

आयएसएलच्या पाचव्या मोसमात सलामीची लढत कोलकत्यातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर याच दोन संघांमध्ये झाली होती. त्यात ब्लास्टर्सने एटीकेला दोन गोलांनी गारद केले होते. त्यामुळे जोरदार चुरस अपेक्षित होती. अखेरची पाच मिनिटे बाकी असेपर्यंत गोलशून्य बरोबरी होती. त्यावेळी दोन्ही संघांनी कसून खेळत चांगले प्रयत्न केले होते, पण त्यांना फिनीशींग करता आले नव्हते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एटीकेने 13 सामन्यांत पाचवी बरोबरी साधली असून चार विजय व तेवढेच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 17 गुण झाले. एटीकेचे सहावे स्थान कायम राहिले. विजय मिळाला असता तर एटीके संघ जमशेदपूर एफसीला (12 सामन्यांतून 19) मागे टाकू शकला असता किंवा गुणांच्या निकषावर गाठू शकला असता. ब्लास्टर्सला सातवी बरोबरी पत्करावी लागली असून एकमेव विजय व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 10 गुण झाले. ब्लास्टर्सचे आठवे स्थान कायम राहिले.
पुर्वार्धात तिसऱ्या मिनिटाला के. प्रशांत याने उजवीकडून सुंदर क्रॉस पास दिला. त्यावर मॅटेज पॉप्लॅटनिक याने चपळाईने प्रतिसाद देत फटका मारला, पण तो स्वैर होता. यजमान संघाच्या चाहत्यांचा श्वास तेव्हा रोखला गेला होता, पण ही संधी वाया गेली.

12व्या मिनिटाला एदू गार्सिया याने बॉक्‍समध्ये चेंडू मारला. त्यावर जॉन जॉन्सन याने प्रयत्न केला, पण त्याचे हेडींग स्वैर होते. 15व्या मिनिटाला आंद्रे बिके याला प्रकाशझोतामुळे चेंडू नीट मारता आला नाही. त्याचा फायदा उठवित स्लाविसा स्टोयानोविच याने चेंडूवर ताबा मिळवित सैमीनलेन डुंगल याला पास दिला. त्यानंतर प्रशांतने प्रयत्न केला, पण चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडूला लागून कॉर्नरसाठी बाहेर गेला. 19व्या मिनिटाला पॉप्लॅटनिक याची घोडदौड रोखताना प्रोणय हलदर याने धसमुसळा खेळ केला. हे बॉक्‍सबाहेर घडल्याने फ्री-किक दिली गेली, पण त्यावर काही घडले नाही.
डुंगलने 30व्या मिनिटाला मध्य क्षेत्रात ताबा मिळवून स्लावीसाला पास दिला, पण या चालीस फिनिशिंगची जोड मिळाली नाही.

गार्सियाने 42व्या मिनिटाला जोरदार प्रयत्न केला, पण ब्लास्टर्सचा गोलरक्षक धीरज सिंग याने चपळाईने चेंडू बारवरून बाहेर घालविला. मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती. दुसऱ्या सत्रातही चुरस कायम राहिली.

निकाल : केरळा ब्लास्टर्स एफसी : 1 (मॅटेज पॉप्लॅटनिक 88) बरोबरी विरुद्ध एटीके : 1 (एदू गार्सिया 85)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)