मावळातील 14 हजार कुटुंबांना शिधा

आमदार सुनील शेळके यांचा विधायक उपक्रम


तालुक्‍यातील वाड्या-वस्तीवरही जीवनावश्‍यक वस्तू घरपोच मिळणार

वडगाव मावळ – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सुरू असलेल्या “लॉकडाउन’मुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून मावळातील 20 हजार गरीब गरजू कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल, अशा जीवनावश्‍यक वस्तू घरपोच देण्याचा उपक्रम मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हाती घेतला आहे.

तालुका प्रशासन आणि आमदार सुनील शेळके मित्र यांच्या वतीने मावळ तहसीलदार कार्यालयच्या परिसरात सोमवार (दि. 13) या उपक्रमाची औपचारिक सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात 14 हजार कुटुंबांना, तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कुटुंबांना वस्तू देण्यात येणार आहे.

या वेळी आमदार सुनील शेळके, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषदेच्या कृषी-पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, राष्ट्रवादी सहकार तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, दीपक हुलावळे, सुदाम कदम, नगराध्यक्ष मयूर ढोरे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, युवक तालुकाध्यक्ष सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, उद्योजक सुधाकर शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

“सोशल डिस्टंसिंग’चे पालन करूनच जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप
प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करताना देखील प्रशासनाने दिलेल्या “सोशल डिस्टंसिंग’बाबत सूचनांचे पालन करण्यात आले. गरजु कुटुंबीयांना एक महिना पुरेल एवढा किराणासह अत्यावश्‍यक 11 वस्तुंचा संच तयार केला आहे. ग्रामीण भागातील आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ येथील गरजू कुटुंबांसह 19 आदिवासी गावे, डोंगर पठारावर असणारे पाडे, वाड्या-वस्त्यांवर जावून घरपोच अन्नधान्य वाटप केले जाणार आहे.

करोना विषाणू विरुद्धची मोठी लढाई आपण लढत आहोत. ती जिंकण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी संयमाने लढा देत आहेत. या लढाईत सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. अडचणीत असलेल्या कुटुंबांना आम्ही मदत नव्हे, तर कर्तव्य भावनेतून या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. तालुक्‍यातील कुठलाही व्यक्ती उपाशी राहणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत.
– सुनील शेळके, आमदार, मावळ.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.