नवी दिल्ली : देशात शाहीनबाग प्रकरणावरून सध्या एकच गोंधळ निर्माण झाला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात डिसेंबर महिन्यापासून आंदोलन सुरु आहे. शेकडो महिला येथे आंदोलन करत असतानाच अचानक काही पोलीस आंदोलनाच्या ठिकाणी आले आणि बुरख्यातील एका महिलेला त्यांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी चौकशी केली असता या महिलेचे नाव गुंजन कपूर असे असून ती भाजपा समर्थक असल्याचे सांगण्यात आले आहे.
शाहीनबागमधील आंदोलनाच्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, बुरख्यात आलेली गुंजन अती जास्त प्रश्न विचारु लागल्याने आंदोलनकर्त्या महिलांना तिच्याबद्दल शंका आली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. गुंजनची तपासणी केली असता तीच्याकडे एक छुपा कॅमेरा अढळून आला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी एकच गोंधळ सुरु केला. गोंधळ पाहून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गुंजनला ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
#WATCH Political analyst Gunja Kapoor extricated by police after protestors at Delhi’s Shaheen Bagh alleged that she was wearing a ‘burqa’ and filming them. #Delhi pic.twitter.com/llRiKhMvOd
— ANI (@ANI) February 5, 2020
बुरखा घालून आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यासंदर्भात गुंजनकडे चौकशी करण्यात आली असता शाहीनबाग येथे गोळीबार करणारा कपील गुज्जर हा आपचा कार्यकर्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर येथील आंदोलकांवर आपच्या कार्यकर्त्याने गोळीबार का केला असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. या आधी मी कधीच कोणत्या आंदोलनात सहभागी झाले नव्हते. मी शाहीन बागमध्येही पहिल्यांदाच गेले होते,असे गुंजनने सांगितले. मी बुरखा घालून गेल्यास येथील आंदोलनकर्त्या महिल्या माझ्याशी मनमोकळेपणे बोलतील असे मला वाटले होते,असेही गुंजनने स्पष्ट केले. अनेकांनी ट्विटवरुन तिच्या या दाव्यांबद्दल शंका उपस्थित केली आहे. तिचे नाव ट्विटवर बऱ्याच काळ ट्रेण्ड होत होते.
दरम्यान, गुंजन ही एक स्तंभ लेखिका असण्याबरोबरच युट्यूबवरील द राईट नरेटीव्ह हे चॅनेलही चालवते. ती स्वत:ला भारताला विश्वगुरु बनवण्यासाठीची कार्यकर्ता असल्याचे सांगते. धक्कादायक बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुंजनला ट्विटवर फॉलो करत असल्याची माहितीही समोर आली आहे. बंगळुरुमधील खासदार तेजस्वी सुर्याही तिला ट्विटवर फॉलो करतात.