वाघोली :वाघोली तालुका हवेली या गावाचा समावेश पुणे महानगरपालिकेत झाला असून वाघोली ग्रामपंचायतच्या वतीने कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून ग्रामस्थांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवले असून पुणे महानगरपालिकेत गाव समाविष्ट झाल्यानंतर वाघोलीतील समस्या सोडवण्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित पाठपुरावा सुरू करण्यात आला असल्याची माहिती माजी सरपंच शिवदास उबाळे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी माहिती दिली.
याबाबत माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी सांगितले की पुणे महानगरपालिकेत वाघोलीचा समावेश झाल्यानंतर वाघोली मध्ये स्मशानभूमी चा पास त्वरित मिळावा, याशिवाय रस्त्यावरील बंद असलेले पथ दिवे त्वरित सुरू करण्याची मागणी, वाघोलीतील लोकसंख्येच्या प्रमाणात कचऱ्याच्या गाड्या तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात.
तसेच गायरान क्षेत्रावरील झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या गोरगरीब नागरीकांचा सर्व संविधान व त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने विचार करून त्यांना न्याय मिळवून द्यावा आदी मागण्यांबाबत शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेचे आयुक्त.
पुणे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्यामार्फत त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी वाघोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व आमदार अशोक पवार विशेष लक्ष देऊन कार्यरत असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे शिवदास उबाळे यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले असून या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच शिवदास उबाळे, किसन जाधव, विठ्ठल शिवरकर, बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेच्या महापौरांना भेट दिल्यानंतर तातडीने वाघोलीतील पथदिवे सुरू करण्यात आले असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढील काळात देखील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
वसुंधरा उबाळे, सरपंच, ग्रामपंचायत वाघोली