पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या आणि पोलिसांच्या प्रश्नांबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये वाळू माफिया, बोपोडी-खडकी भागातील चोऱ्या, मारामारी, छेडछाड,
गोखलेनगरमधील हुतात्मा तुकाराम ओंबळे मैदान, वीर बाजीप्रभू चौकात चाललेला मद्यपींचा गोंधळ आणि दहशत मोडून काढण्यासाठीही कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांची गस्त वाढवणे, पोलिसांची संख्या या विषयांवरही अनेकदा आवाज उठविल्याचे शिरोळे म्हणाले.
सोलापूर रोडवर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या तलाठ्यांना मारहाण, तहसीलदारांना शिवीगाळ या प्रकाराविरुद्धही शिरोळे यांनी आवाज उठवला आणि गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची यासंदर्भात प्रत्यक्ष भेट घेतली आणि लेखी निवेदनही त्यांनी दिले होते.
१८ वर्षांखालील अल्पवयीन मुले नशापान, चोऱ्या, छेडछाड, मारामाऱ्या अशी गुन्हेगारी कृत्यांकडे वळत आहेत. त्यामुळे यांना अटकाव करणे आवश्यक असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, तसेच योग्य ती कार्यवाही केली पाहिजे, असेही त्यांनी निवेदनाद्वारे तत्कालीन गृहमंत्र्यांना कळविले होते.
या सगळ्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर खडकी – बोपोडी येथील पोलीस चौक्या सुरू कराव्यात, बोपोडी परिसरातील जुन्या जकात नाक्यावर पोलीस चौकी सुरू करावी, खडकी बाजार पोलीस चौकी सुरू करावी, यासाठीही शिरोळे यांनी प्रयत्न केले.
त्याबाबत स्वत: त्याठिकाणी जाऊन पाहणी केली आणि बोपोडी येथील चौकी सुरू करण्यात यश मिळवले. एवढेच नव्हे तर चौकीतील यंत्रणा अत्याधुनिक केली आणि आमदार निधीतून संगणकही पुरवले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला होता. तेथे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूक बदल, रस्ता बंद, यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता.
त्याठिकाणी जादा पोलीस नेमून आणि योग्य पद्धतीने अभ्यासपूर्ण वाहतूक नियमन व्हावे, यासाठी पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा करून ते काम करून घेतल्याने तेथील वाहतूक कोंडीचा प्रश्न बराच निकाली निघाला असल्याचे शिरोळे म्हणाले.