सार्वजनिक जीवनात दिलेले शब्द पाळावेत-अश्‍विनी कदम

पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससह मित्रपक्षांनी जनतेला जे आश्‍वासन दिले, ते सातत्याने आजवर पूर्ण केले आहेत; परंतु आता फसवे आश्‍वासन देणारे सरकार सत्तेवर आले असून देशासह महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान होत आहे. आता हीच योग्य वेळ असून भावनेवर मतदान न करता पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करून मतदान करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्ष महाआघाडीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार अश्‍विनी कदम यांनी केले. कदम यांच्या प्राचारार्थ प्रभाग क्र. 30 जनता वसाहत-दत्तवाडी याठिकाणी कोपरा सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कदम म्हणाल्या, भाजप शासन सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पर्वती मतदारसंघाचा आजवरच्या शाश्‍वत विकासामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचा महत्त्वाचा सहभाग असून आघाडी शासनाच्या काळातच पर्वतीमध्ये अनेक रचनात्मक कामे झाली आहेत. गेल्या दहा वर्षांत एकही ठोस काम झाले नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. आता मात्र विचार करण्याची वेळ आली असून आपले मत बदलले, तरच परिपूर्ण आणि नियोजनबद्ध विकास होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

यावेळी आशा हॉटेल परिसर, फुले उद्यान परिसर, अर्चना सोसायटी परिसर, रक्षालेखा सोसायटी परिसर, सत अभिरुची मित्र मंडळ परिसर, भूमी सोसायटी परिसर, मोरेश्‍वर मित्र मंडळ परिसर, म्हसोबा चौक परिसर, माजी नगरसेवक विनायक हनमघर यांचे जनसंपर्क कार्यालय परिसर, सुदर्शन मित्र मंडळ परिसर, श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, लडकतवाडी परिसर, भंडारी हॉटेल परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी आघाडीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.