सरकारच्या सूचनांचे पालन करा! – जयंत पाटील यांचे जनतेला आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) – प्रगत देशात करोना व्हायरसमुळे हजारो बळी जात आहेत. त्यामुळे आपल्याला काही होणार नाही, या भ्रमात राहू नका. पोलिसांना सहकार्य करुन सरकारच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जनतेला केले.

जयंत पाटील यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवरुन जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी करोना विषाणूने जगभरात कसे थैमान घातले आहे, याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 दिवसाचे लॉकडाऊन का जाहीर केले हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवे. करोनाचा संसर्ग झाला असेल तर या दिवसात त्या व्यक्तीची लक्षणे समजणार आहे. त्यामुळे या लॉकडाऊनची शिस्त पाळली पाहिजे. नाहीतर आपल्याला फार मोठे परिणाम भोगावे लागतील, अशी भीतीही पाटील यांनी व्यक्त केली.

जगात लाखोंच्या संख्येने नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. 24 तासात 46 हजार 484 ही लागण होत आहे. तर अडीच हजार मृत्यूमुखी पडले आहेत. दुर्दैवाने हे आकडे आपल्याला ऐकायची वेळ आली आहे. भारतातही एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

जगात अशी आकडेवारी कधी ऐकली गेली नाही. इतका गंभीर स्वरूपाचा हा विषाणू आहे. त्यामुळे आपण याबाबत गंभीर आहोत का याचा अभ्यास करायला हवा, असेही जयंत पाटील म्हणाले. संकट टाळायचे असेल आणि त्याचा बिमोड करायचा असेल तर घरातच रहा. काही लोक विनाकारण बाहेर फिरत आहेत. मात्र पुढचे 14 दिवस आपल्यासाठी गंभीर आहेत. त्यामुळे प्रत्येकाने घरातच रहायला हवे. घराबाहेर पडायचे टाळा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.