उदयनराजेंच्या वक्तव्यामळे जिल्हा भाजपमध्ये दुफळी
सातारा – विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीवेळी कराड येथे झालेल्या प्रचार सांगता सभेत भाजपचे सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दाखला देत उदयनराजेंनी त्यांना स्टेजवरून खेचले असते, अशी टीका गुरुवारी कराड येथे मुस्लीम बांधवाच्या समवेत बोलताना केली होती.
त्यामुळे भाजपच्याच एका गटाने सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल करून विक्रम पावसकरांच्या पाठीशी असल्याची भूमिका घेतल्याने सध्या भाजपमध्ये दुफळी तयार होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपमध्ये शिस्तीला प्राधान्य असल्याचा संदेश सोशल मीडियाद्वारे दिला जात आहे.
लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या कराड येथील सांगता सभेत विक्रम पावसकर यांनी मुस्लिम समुदायाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे सांगत उदयनराजेंनी मुस्लिम समाजाची जाहीर माफी मागितली. उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर भाजपचे मूळ कार्यकर्ते आता आक्रमक झाले असून त्यांनी सोशल मीडियावरून विक्रम पावसकरांची पाठराखण केली आहे.
मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी “विक्रमजी आम्ही कायम आपल्यासोबत आहोत,’ असे सांगत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांचे समर्थनही सोशल मीडियावर केले आहे. हिंदुत्वाची जोड देत अशा समर्थन करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर भाजपच्या काही कार्यर्त्यांकडून फिरत असून त्याखाली सातारा जिल्हा भाजपा असे लिहले आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच कोणत्या ना कोणत्या कारणाने थेट भाजपच्या जिल्हा अध्यक्षांबद्दलच वक्तव्य केल्याने सध्या भाजपअंतर्गत मोठी खळबळ उडाली आहे.
राजेंनी केलेला शाब्दिक हल्ला पावसकरांच्याही जिव्हारी लागल्याचे सांगण्यात येत आहे. कारण हिंदुत्वाच्या अजेंड्यांवरच पावसकरांची दुसरी पिढी ज्या कराडात काम करते, त्याच कराडात राजेंनी त्यांच्याबद्दल हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिस्तीचा पक्ष असणारा भाजप या सगळ्याकडे कसा पाहतो, यावरच भविष्यात भाजपतील उलथापालथी अवलंबून राहतील.