साद-पडसाद: अनुकरण नको अनुसरण करा…

देवयानी देशपांडे

विचारांवर आरूढ होणाऱ्या निवडणुकांच्या प्रभावापासून अलिप्त राहून लोकशाहीतील आपली भूमिका प्रत्येक नागरिकाने चोख बजावायची आहे. याला वास्तवाच्या जाणिवेची साथ हवीच. नेतेमंडळी सांगतात म्हणून त्यांचे अंधानुकरण करणे योग्य वाटत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच “फिट इंडिया’ मोहिमेची घोषणा केली. आपल्या दैनंदिन जीवनात खेळ आणि तंदुरुस्तीचे महत्त्व या माध्यमातून त्यांनी व्यक्‍त केले. या अंतर्गत “हम फिट तो इंडिया फिट’ नावाची मोहीमदेखील सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीही योगशास्त्राचे महत्त्व सांगून मोदी यांनी भारताचे जगातील वेगळेपण अधोरेखित केले आहे. अशा मोहिमांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी भारतीयांना अवाक करण्याचे खास निमित्त कायमच जुळवून आणतात. निर्णय जाहीर केल्यावर त्यांचा आवाज आणि करिष्मा अनेकांच्या मनी पुढचे अनेक दिवस रेंगाळत राहतो. शिवाय, मोदींच्या अफाट ऊर्जेची करावी तितकी तारीफ कमीच आहे. तरुणांना लाजवेल अशा त्यांच्या ऊर्जेने अनेकांना भुरळ पाडली आहे.

या अनुषंगाने, व्यक्‍तिगत पातळीवर सजगपणे काही बाबींचा विचार होणे प्राप्त आहे. “नेतृत्व’ म्हणजे काय? हे प्रथमतः समजून घेऊया. त्यानंतर अभिजात समाजशास्त्रज्ञ मॅक्‍स वेबर यांच्या विचारांतील दैवीगुणाधिष्ठित अधिकारसंबंध व्यवस्था आणि अन्वयाने, दैवीगुणाधिष्ठित नेतृत्व (उहरीळीारींळल ङशरवशीीहळ)य्यिा संकल्पना समजून घेऊयात.

“नेतृत्व’ या संकल्पनेशी संबंधित काही सिद्धान्त रूढ आहेत. प्रथमतः एखाद्या व्यक्‍तीमध्ये नेतृत्वगुण जन्मतः अथवा अंगभूत असतात असे मानणारा सिद्धान्त रूढ होता. त्याला “ग्रेट मॅन’ सिद्धान्त असे म्हणत. मात्र, असे गुण विकसित करता येतात हे अभ्यासांती ध्यानात आले तसा हा सिद्धान्त खोडून काढण्यात आला. त्यानंतरच्या तिसऱ्या टप्प्यात नेतृत्वाकडे व्यक्‍तिगत गुणांपेक्षा “एखादी कृती करण्याचे कौशल्य’ या अर्थाने पाहण्यात आले. मग यातूनच पुढे “नेतृत्वशैली’ ही संज्ञा रूढ झाली. ही संज्ञा आज साऱ्यांच्या तोंडी आहे. तद्‌नंतर, वेबर यांच्या विवेचनातील “दैवीगुणाधिष्ठित नेतृत्व’ म्हणजे काय ते समजून घेऊया. आपल्या आजूबाजूला असे नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते का? की केवळ तसे भासवले जाते? याबाबत स्पष्टता येणे आवश्‍यक आहे. याशिवाय, त्या नेतृत्वाचे अनुकरण करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे का? या प्रश्‍नाचेही उत्तर मिळेल.

वेबर यांच्या सिद्धान्तानुसार, दैवीगुणाधिष्ठित नेतृत्व करणारी व्यक्‍ती लोकोत्तर असते. व्यक्‍तीच्या लोकोत्तरतेमुळे लोक तिच्याकडे आकृष्ट होतात. त्या व्यक्‍तीचे अनुकरणदेखील करावेसे वाटते. जी गोष्ट आपल्याला जमत नाही अशी कोणतीही गोष्ट इतर व्यक्‍तीने करून दाखवल्यास त्या व्यक्‍तीबद्दल आदर आणि कौतुकाची भावना आपल्या मनात साहजिकच निर्माण होते. मग लोकोत्तर व्यक्‍तीचे अलौकिकत्व स्वीकारून तिचे अनुसरण करणे हे आपले कर्तव्यच आहे अशी भावना सामान्य लोकांमध्ये निर्माण होते. आपल्या आज्ञांचे, निर्णयांचे सामान्यांनी पालन करावे, हे त्यांचे कर्तव्यच आहे असे दैवीगुणाधिष्ठित व्यक्‍तीलादेखील वाटते. याबाबत विचार करण्यासारखा आणखी एक मुद्दा आहे. दैवीगुणाधिष्ठित नेतृत्व प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारे असते. असे नेतृत्व प्रकृत्याच चाकोरीभंजक असते. हिटलर, गौतम बुद्ध यांसारख्या अनेक उदाहरणावरून ही बाब आपल्या ध्यानात येईल.

आता व्यक्‍तिगत पातळीवर आणखी एका प्रश्‍नाचे उत्तर शोधूया. कुणीतरी नेतृत्व करते आणि कुणीतरी ते स्वीकारते म्हणजे नेमके काय घडते? विचारांच्या या प्रक्रियेत एक बाब ध्यानात येते, “नेतृत्व’ ही संकल्पना समजून घ्यायची असेल तर मूलभूत पातळीवर “अनुकरण’ आणि “अनुसरण’ यांतील फरक समजून घ्यावा लागतो. अनुकरण आंधळेपणाने केलेले असू शकते. अनुसरण मात्र डोळस असावे लागते. मी अमुक एखाद्या नेत्याचे बोल प्रमाण मानतो/मानते तेव्हा मी “अंधानुकरण’ करत नाही ना? याबाबत सजग असावे लागते.

अनुकरणापेक्षा एखाद्या वाटेचे अनुसरण केले असता, ती कृती विचारांना धरून केलेली कृती ठरते असे आपल्या ध्यानात येईल. अनुसरण झाल्यास अंधानुकरणातून उद्‌भवणारा वैचारिक गोंधळदेखील आपोआप नाहीसा होईल.

सद्यःपरिस्थितीत कोणतीही योजना अथवा निर्णय सर्वसामान्यांना मोहित करत आहे. मग तो “फिट इंडिया’चा नारा असो किंवा नोटाबंदीचा निर्णय असो. असेच पूर्वी “गरिबी हटाव’ आणि “मनरेगा’च्या बाबतीत देखील झाले आहे. मात्र, साऱ्याच नागरिकांनी सजग राहून काही विचार करणे प्राप्त आहे. आपल्यासमोरील साऱ्याच समस्यांचे निराकरण झाले आहे का? आपण दैवीगुणाधिष्ठित नेतृत्वाच्या प्रभावाखाली तर नाही ना? आपले सारेच प्रश्‍न सरकारच सोडवू शकते का? केवळ दैवीगुणाधिष्ठित नेतृत्वाचे अनुकरण करून आपण विचारांना बगल तर देत नाही ना? सारेच निर्णय लोकहिताचे आहेत की त्यांना राजकारणाची छटा कायम आहे?

या साऱ्या मुद्द्यांच्या पल्याड दैवीगुणाधिष्ठित व्यवस्थेला स्थिर स्वरूप प्राप्त झाले, असे नेतृत्व व्यक्‍ती व्यतिरिक्‍त व्यक्‍तीसमूहाकडे सोपवले गेले तर उद्‌भवणारी समस्या आपल्या आटोक्‍यातली असणार आहे का? दैवीगुणाधिष्ठित नेतृत्वाचे स्थिरीकरण झाले असता ते लोकशाही व्यवस्थेला धरून असेल का? हा प्रत्येक नागरिकाने आपापल्या पातळीवर सजगपणे करावयाचा विचार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)