पुणे – करोनामळे गेले सात-आठ महिने लोककलावंतांना त्यांचे कार्यक्रम सादर करता आले नाहीत. वंशपरंपरेने आपापल्या लोककलांचे जतन करणाऱ्या लोककलावंतांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे “लोककला 2020′ हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत सलग 20 दिवस दररोज 20 मिनिटे याप्रमाणे 20 वेगवेगळे लोककलांचे प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजमाध्यमांवरून सादर केले जाणार आहेत. या निमित्ताने बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर लोककलावंतांना प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
दि. 30 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत दररोज रात्री 8 वाजता हे सादरीकरण प्रसारित केले जाईल. यात पोवाडा, वासुदेवाची गाणी, पोतराजाची गाणी, भराडी, हलगीवादन, वारू, लखाबाईची गाणी, लावणी आदी कार्यक्रम सादर होणार आहेत.
या कार्यक्रमांचा सर्व रसिकांना समाजमाध्यमांवरून विनामूल्य लाभ घेता येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे. पुणे जिल्ह्यातील या लोककलावंतांना दाद देण्यासाठी सर्व रसिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे मानद संचालक डॉ. प्रवीण भोळे यांनी केले आहे.