विज्ञानविश्‍व: मायक्रोप्लॅस्टिकवर तोडगा

डॉ. मेघश्री दळवी

प्लॅस्टिकच्या भस्मासुराचं थैमान आपण रोज पाहतो आहोत. कधी तुंबलेले नाले, तर कधी प्लॅस्टिकमध्ये अडकून वेदनेने कळवळणारे प्राणी. या नजरेस पडणाऱ्या प्लॅस्टिकपलीकडे अगदी सूक्ष्म आकाराचं प्लॅस्टिकदेखील आता आपल्याला धोकादायक ठरत आहे. साधारणपणे मायक्रोमीटर ते मिलीमीटर आकाराच्या प्लॅस्टिकच्या तुकड्यांना शास्त्रज्ञांनी अलीकडे मायक्रोप्लॅस्टिक म्हणायला सुरुवात केली आहे. इतक्‍या लहान आकारामुळे ते दिसत नाही, पण अन्न, पाणी आणि हवा यातून मात्र ते आपल्या शरीरात शिरत आहे, हानी पोहचवत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण वापरलेलं प्लॅस्टिक बऱ्याचदा थेट समुद्रात जातं. तिथे त्याचे हळूहळू तुकडे होतात. विविध रसायनं, पाण्यातल्या लहानमोठ्या लाटा, जलचरांचे चावे घेऊन केलेले तुकडे, यांच्यामुळे या प्लॅस्टिकचे आणखी लहान-लहान कणांमध्ये रूपांतर होत ते अतिसूक्ष्म पातळीवर पोचतात. हेच मायक्रोप्लॅस्टिक. आज जगात सुमारे दोन लाख टन वजनाचे पन्नास ट्रिलियन मायक्रोप्लॅस्टिक कण विविध मार्गांनी सर्वत्र पसरत आहेत. त्यांच्यासाठी फिल्टर बनवणे कठीण आहे आणि त्यांना रोखणे जवळजवळ अशक्‍य होत आहे. म्हणूनच गेल्या पाच वर्षांमध्ये मायक्रोप्लॅस्टिकवर उपाय मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ शर्थींचे प्रयत्न करत आहेत.

या वर्षी याबाबत एक आशेचा किरण दिसायला लागला आहे. गुगलची दरवर्षी एक सायन्स फेअर भरते. तेरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थी यात भाग घेऊन आपले वैज्ञानिक प्रकल्प सादर करतात. त्यातून वेगवेगळ्या विभागांचे काही विद्यार्थी निवडून शेवटी एकाला गुगल ग्रॅंड प्राइज दिले जाते. यावर्षी या स्पर्धेत गुगल ग्रॅंड प्राइज मिळवणाऱ्या फियान फेरेरा या आयरिश विद्यार्थ्याचा प्रकल्प मायक्रोप्लॅस्टिकवर तोडगा सुचवणारा आहे.

मायक्रोप्लॅस्टिक जास्त करून आढळतात ते समुद्रात आणि नदीत. म्हणूनच हा प्रकल्प पाण्यातून मायक्रोप्लॅस्टिक वेगळं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी फियानने फेरोफ्लुइड म्हणजेच लोहयुक्‍त द्रवाचा वापर केला आहे. या द्रवात चुंबकीय गुणधर्म असतात. विशेष म्हणजे मायक्रोप्लॅस्टिक या चुंबकीय द्रवाला प्रतिसाद देताना आढळले आहे. याच गुणधर्माचा वापर करून फियानने पाण्यातून मायक्रोप्लॅस्टिक वेगळे करण्याचा प्रकल्प मांडला. त्याने निरनिराळ्या पाण्याच्या नमुन्यांवर चाचण्या घेतल्या त्यात त्याला सुमारे ऐंशी टक्‍के यश मिळताना दिसले.

हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबवला, तर मायक्रोप्लॅस्टिकच्या प्रदूषणाला आळा घालणे आवाक्‍यात येऊ शकेल हे लक्षात घेऊन गुगलने फियानला हे ग्रॅंड प्राइज दिलं आहे. मायक्रोप्लॅस्टिकचा आपल्या सर्वांच्या आरोग्याला असलेला धोका किती गंभीर आहे हे यावरून लक्षात येईल. मायक्रोप्लॅस्टिक आपल्याला दोन दिशांनी रोखता येईल. ते तयार होऊ न देण्यासाठी आपण प्लॅस्टिकचा वापर कमी करू शकतो, पुनर्वापर करू शकतो आणि त्यावर पुनर्प्रक्रिया करू शकतो. आणि ते तयार झालंच तर ते वेगळं करणे. फियान फेरेराचा तोडगा हा दुसऱ्या प्रकारचा उपाय आहे. त्याचा लवकरात लवकर वापर करता आला, तर आपण मायक्रोप्लॅस्टिकचा धोका नक्‍कीच कमी करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)