धुके, हवामान बदलाचा पपई पिकाला फटका

रोग पडत असल्याने शेतकरी अडचणीत

लाखनगाव – मागील अनेक दिवसांपासून पडत असलेल्या धुक्‍याचा प्रादुर्भाव पपई पिकावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. परिणामी पपईची पाने वाळत आहेत. तसेच पपई फळांची वाढही होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

आंबेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी अडीच वर्षांपूर्वी लावलेले पपईचे पीक मागील वर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या तुटवड्यामुळे वाया गेले. यावर्षी झालेल्या अतिपावसामुळे व त्यानंतर होणाऱ्या धुक्‍यामुळे पपईवर रोगराई आली आहे. त्यामुळे पपईचे पीक फायदेशीर ठरत नाही. सध्या पहिला 10 ते 15 रुपये प्रति किलो असा बाजार भाव मिळत आहे. परंतू एकंदरीत भांडवली खर्च पाहता. तसेच हवामानाचा पपईच्या वाढीवर परिणाम झाला आहे. लहान आकाराच्या पपई पिकल्या जातात.

त्यामुळे पपई पूर्णपणे मोठी होत नाही. वजन कमी भरते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून पपईची लागवड केली जाते. परंतू मागील अडीच वर्षात झालेला भांडवली खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे पपईचे पिक तोट्यात जात आहे. वातावरणाचा फटका पपई पिकासह अनेक पिकांना झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे पाहावयास मिळत आहे.

त्यामुळे या भागातील पपई उत्पादक चिंताग्रस्त झाला आहे. उन्हाळ्यात पाण्याने मारले. पावसाळ्यात अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. आत्ता धुके आणि रोगाने पुन्हा नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी पिकांवर फवारणी करुन वैतागला आहे. तरीही पिकांवरील रोग काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढच होताना दिसून येत आहे.

चांगल्या पपईला जरी 10 ते 15 रुपये बाजार भाव असला तरी चांगली पपई कमी प्रमाणात निघते. त्यापेक्षा दोन आणि तीन क्रमांकाची लहान आकाराची पपई जास्त प्रमाणात निघतात. त्यामुळे पंधरा रुपये बाजार भाव हा शेतकऱ्यांना फायदेशीर आहे, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी असते. लहान आकाराची फळे जास्त निघत असल्यामुळे शेतकऱ्याला सध्यातरी पपईचे पीक फायदेशीर ठरत नाही.
– दत्ता वळसे, पपई उत्पादक शेतकरी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here