जनावरांच्या चाऱ्याचे दर भिडले गगनाला

सरकी पेंड, भुस्सा व पापडीच्या दारातही झाली वाढ  

प्रल्हाद एडके /नगर: जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर बनला आहे. चाऱ्याचे दर वाढल्याने पशुपालन करणारे शेतकरी व दुध व्यावसायिकांच्या समस्या वाढल्या आहेत. चारा छावणीसाठी मोठ्या प्रमाणात चारा घेवून तो साठवला जात असल्याने सर्वसामान्य पशुपालकांवर मात्र चढ्या दराने चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. चाऱ्याच्या दरात दुप्पटीने वाढ झाल्याने पशुपालक पुरता हवालदिल झाला आहे. हिरवा चाऱ्याची दर तर मनमानी पद्धतीने झाले आहे. गेल्या महिन्यापर्यंत ऊसाचे वाढे मिळत होते. परंतू कारखान्यांचा धुराडा बंद झाल्याने आता वाढे देखील मिळणे अवघड झाले आहे. छावण्यांना कसाबसा चारा उपलबध होत असतांना बाजारात चारा जो काही उपलब्ध चारा आहे. तो विकत घेतांना शेतकरी मेटाकुटीला येत आहे.त्यातच कोरडा चारा म्हणून ओळख असलेल्या सरकी पेंड, भुस्सा, गोळी पेंड व पापडी पेंडच्याही दरात वाढ झाल्याने पशुपालक वैराण झाला आहे.

गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने ऑक्‍टोबर महिन्यापासून जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती. खरीपापाठोपाठ रब्बी देखील वाया गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न बिकट झाला आहे. यंदा सरासरीच्या केवळ 63 टक्‍के पावसाची नोंद झाली आहे. रब्बी हंगामात ज्वारीचे पिक मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात होते. परंतू यंदा ज्वारीच्या पिकात मोठी घट झाल्याने वैरण मिळणे अवघड झाले आहे. त्यात पाऊस न झाल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी घेतली जाणारी मका, घास, कडवळ, गिन्नी गवत ही पीके पाण्याअभावी शेतकऱ्यांना जगवता आली नाही. त्यातच कारखाने सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांकडील उपलब्ध ऊस कारखान्यांना देण्यात आला. यानंतरही शिल्लक राहिलेला ऊस ठिकठिकाणी सुरु झालेल्या छावणी चालकांनी विकत घेतला. अनेक दिवसांसाठी चारा पुरावा या हेतुने छावणी चालकांनी अतिरिक्त चारा विकत घेतला. त्यामुळे अचानक चाऱ्याची कमतरता जाणवू लागली व चाऱ्याचे भाव कडाडले आहेत. हिरव्या चाऱ्याची कमतरता जाणवू लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा कोरड्या चाऱ्याकडे वळवला, परंतू दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांच्याही किमती वाढल्या आहेत.

सध्या बाजारात मका, वाढे, घास, कडवळ यांसारखा हिरवा चारा उपलब्ध आहे. मात्र त्याचे दर वाढलेले आहेत. या अगोदर 10 रुपयांना मिळणाऱ्या वाढ्याच्या भेळ्यासाठी आता 20 रुपये मोजावे लागत आहेत. 10 ते 15 रुपयांना मिळणारा मकाचा भेळा आता 30 रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. 3 रुपयांना मिळणारी घासाची पेंढी आता 8 ते 10 रुपयांना घ्यावी लागत आहे. तसेच कोरड्या चाऱ्यात 1 हजार 250 रुपयांना मिळणाऱ्या सरकी पेंडेच्या 50 किलोच्या पोत्यासाठी आता 1 हजार 450 रुपये मोजावे लागत आहे. तसेच गोळी पेंड, भुस्सा, पापडी पेंड यांच्याही पोत्यामागे प्रत्येकी 100 रुपयांनी वाढ झाली आहे. या सर्व परिस्थितीत आगामी काळात पशुधन कसे जगवायचे असा प्रश्‍न पशुपालकांपुढे पडला आहे. याचाच परिणाम जोडधंदा म्हणून दुध व्यवसायतकडे वळलेल्या शेतकऱ्यांवरही होत आहे.

ज्वारीचे क्षेत्र घटले !
जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र दीड ते दोन लाख हेक्‍टरपर्यंत होते. तथापि, अलीकडच्या काही वर्षांमध्ये हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले असून, 2018-19 मध्ये 30 ते 35 हजार हेक्‍टरपर्यंत पेरणी झाल्याने ज्वारीपासून मिळणाऱ्या कडब्याचे दर वाढले.


छावण्या चालकांकडून मोठ्या प्रमाणात केलेल्या चारा खरेदीमुळे बाजारात चारा टंचाई निर्माण झाली आहे. आगामी 15 दिवसांत अधिक कठीण परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
– विशाल वरकड, चारा विक्रेता बनप्रिंप्री.


आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह दुध व्यवसायावर चालतो. हिरव्या चाऱ्याबरोबरच कोरड्या चाऱ्याचेही दर वाढल्याने व्यवसाय अडचणीत आला आहे.
– अशोक निकाळजे, शेतकरी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.