चारा उपलब्ध नाही; छावण्या बंद करण्याची घाई

सविंदणे – यंदा दुष्काळीची भयाण स्थिती पाहता 1 जुलैनंतरही चारा छावण्या सुरू राहतील, असे राज्य सरकारच्या वतीने जाहीर केले आहे. दुसरीकडे चारा उपलब्ध न झाल्याचे कारण देत चारा छावण्या गुंडाळल्या जात असल्याचे चित्र शिरूर तालुुक्‍यात दिसत आहे.

दुष्काळानंतर पावसाने चांगली हजेरी लावली; परंतु चारा तयार होण्यासाठी किमान महिना-दिड महिना कालावधी लागणार आहे. या परिस्थितीत ज्यांनी शासनाच्या वतीने चारा छावण्या सुरू केल्या त्यांनी शेतकऱ्यांना जनावरे छावणीतून नेण्यास सांगितली आहेत. अशा परिस्थतीत शेतकऱ्यांना जनावरासाठी चारा आणायचा कोठून? हा गंभीर प्रश्‍न असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. छावण्या बंद करण्याचा निर्णय नक्की कोणाचा याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

शिरूर तालुक्‍यात शासनाच्या वतीने भीमाशंकर सहकारी कारखान्याने पाबळ, टाकळी हाजी; पराग कारखान्याने दुडेवाडी, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी कारखान्याने न्हावरा येथे, राधेशाम महिला बचत गटाने केंदूर तसेच कान्हूर मेसाई येथे चारा छावण्या सुरू केल्या होत्या. या छावण्यांसाठी शासनाकडून निधीदेखील उपलब्ध आहे. या सर्व परिसरात जून अखेरीसपासून पाऊस समाधानकारक झाल्याचे कारण देत चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; परंतु पाऊस झाला म्हणजे लगेच चारा तयार होत नाही. त्यासाठी महिना-दिड महिना कालावधी लागतो. शेतकऱ्यांकडे लगेच चारा उपलब्ध नसल्यामुळे आणखी काही दिवस छावण्या सुरू राहाव्यात, अशी मागणी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी केली आहे.

छावण्या बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे घरी घेऊन जावे लागत आहे. चारा उपलब्ध नसल्याने जनावरांचे हाल होत असून शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. चाऱ्यांची उगवण होईपर्यंत छावण्या सुरू ठेवण्याची मागणी केली जात आहे.

150पेक्षा जास्त जनावरे छावणीत नसल्याने सरकार छावणीला अनुदान देत नाही. पाऊस पडल्याने अनेकांनी आपली जनावरे स्वत:हून नेली आहेत. त्यामुळे संख्या कमी झाली आहे. आता छावणी बंद करण्यात आल्याने इतर शेतकऱ्यांना नाइलाजास्तव जनावरे घरी घेऊन जावे लागत आहे. फक्त कान्हूर मेसाई येथील चारा छावणी सुरु असून तेथे सहाशेहून अधिक जनावरे आहे. बाकीच्या चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत.
– श्रीशैल वट्टे, निवासी नायब तहसीलदार शिरूर


पाऊस जास्त झाल्यामुळे शेतामध्ये पाणी साठले आहे. यामुळे चारा वाहतूक करणे शक्‍य झाले नाही. याशिवाय चारा उपलब्ध होऊ न शकल्याने नाइलाजास्तव आम्ही शासनाकडे चाऱ्याची मागणी केली; परंतु चारा उपलब्ध न झाल्याने छावण्या बंद केल्या असून तसा अहवाल शिरूर तहसीलदार यांच्याकडे पाठविला आहे.
-चंद्रकांत ढगे, कार्यकारी संचालक भीमाशंकर साखर कारखाना


न्हावरा येथे अतिशय नियोजनबद्ध चांगल्या दर्जाचा जनावरांना चारा देऊन छावणी चालू ठेवली होती; परंतु आता चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी जनावरे घरी नेली आहेत. त्यामुळे छावणी बंद करण्यात आली.
-ऍड. अशोक पवार, चेअरमन घोडगंगा साखर कारखाना

चारा छावण्या बंद केल्याने आमच्या जनावरांची उपासमार झाली आहे. चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न आमच्या पुढे उभा राहिला आहे. चारा तयार होईपर्यंत तरी शासनाने छावण्या चालू ठेवाव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे.
-अमोल घोडे, शेतकरी, निमगाव दुडे


चारा उपलब्ध नसल्याने नाइलाजास्तव जनावरे घरी घेऊन जावे लागत आहे. जनावरांना चारा आणायचा कोठून? असा प्रश्‍न आमच्या शेतकऱ्यांना पडला असून चारा तयार होईपर्यंत शासनाने अजून काही दिवस छावण्या चालू ठेवाव्यात, अशी आमची मागणी आहे.
-तुषार साठे, शेतकरी न्हावरा

Leave A Reply

Your email address will not be published.