पाण्याअभावी उसाचे पीक ठरतेय जनावरांसाठी चारा

मुळा-मुठा नदीपट्टयात देखील दुष्काळी स्थिती : केडगावात बळीराजाला मॉन्सूनची प्रतीक्षा

केडगाव – मागील चार महिन्यांपासून उन्हाळा असह्य झाल्यामुळे उष्णता आणि पाणी समस्या कमी होण्यासाठी आता केवळ पावसाची आशा निर्माण झाली आहे. पाऊस केव्हा येणार, यासाठी सर्वसामान्य नागरिक आभाळाकडे टक लावून बसला आहे.

मागील दोन वर्षांपासून पाऊस झालाच नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीसमस्या निर्माण झाली. चालू वर्षी वातावरणात 42 अंश सेल्सियसपर्यंत तापमान आणि पाण्याची गंभीर समस्या अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागला. अगदी भीमा व मुळा-मुठा नदीपट्टयातदेखील दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. नदी परिसरातील राहु, देलवडी, पिंपळगाव, पारगाव, नानगाव, हातवळण, कानगाव या गावांनाही पाणी समस्या कमी-अधिक प्रमाणात भेडसावत आहे. केडगाव आणि परिसरातील दापोडी, खोपोडी, बोरीपार्धी इत्यादी गावांतील शेतकऱ्यांनी आपली शेती आता रामभरोसे सोडून दिली असून केवळ पिण्याच्या पाण्याची गरज कशी भागेल, असा विचार सुरू केला आहे. काही शेतकऱ्यांनी कोवळा ऊस कडबा कुट्टीसाठी मिळेल, त्या भावात देणे पसंद केले आहे, तर काहीजण जनावरांना चारा म्हणून त्याचा उपयोग करीत आहेत. आता जून महिना सुरू झाला असून रोहिणी नक्षत्रात पाऊस सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे; परंतु यामधील तीन दिवस कोरडेच गेले आहेत. त्यातच हवामान खात्याने मान्सून 12 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याचे संकेत दिले असून, अजून किमान सात-आठ दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे. खडकवासला धरण क्षेत्रात कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने कालव्याच्या पाण्यावर भिस्त ठेवणे मृगजळ ठरणार आहे, त्यामुळे वाढती उष्णता आणि शेती टिकवण्यासाठी आता केवळ पावसाचाच आधार उरला असल्याने पाऊसाच्या येण्याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.