सातारा – प्रशासकीय इच्छाशकती दाखवत अखेर सातारा पालिकेने शहराच्या जैवविविधता अहवालाच्या कामाला गती दिली आहे. शहरातील पर्यावरणीय नोंदीबाबत सर्वेक्षण करण्याचे काम पुण्याच्या ऑरकॉन या प्रसिद्ध संस्थेला देण्यात आले असून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
सातारा शहरातील वृक्ष, त्यांच्या प्रजाती, मोजदाद, वर्गीकरण, प्राणी व पक्ष्यांचे वर्गीकरण, जलसंपत्ती सर्वेक्षण, मृदांचे प्रकार, नोंदी, पर्जन्य अहवाल, लोकजीवन, सामाजिक निर्देशांक, स्त्री-पुरुष गुणोत्तर, सरासरी वय, औद्योगिकीकरण व शेती यांचे प्रमाण, जलसाठ्यांच्या नोंदी
असा तपशीलवार जैवविविधता अहवाल तयार करण्यात येणार आहे.
शासकीय मानकाप्रमाणे जैवविविधता नोंदवहीचा खर्च 40 हजार रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. सातारा शहराचा अहवाल बनवण्याची जवाबदारी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ऑरकॉन या पुण्याच्या संस्थेला देण्यात आली आहे. प्रकल्प तयार करण्यासाठी तीन लाख रुपये खर्च येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रकल्प अहवाल याच संस्थेने अभ्यासपूर्वक केला होता.
त्यामुळेच सातारा पालिकेनेही पर्यावरण प्रकल्पाची जवाबदारी या संस्थेकडे दिली आहे.
पालिकेच्या जैवविविधता समितीतील कार्यकारी मंडळाचे सचिव तथा उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याची इच्छाशकती दाखवल्याने जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत जैवविविधता नोंदवही बनविण्यात सातारा पालिकेने आघाडी घेतली आहे.
पाच कोटी रुपये निधी मिळणार?
प्रकल्प अहवालाच्या नोंदी व पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना यांचा संबंध निधी वाटपाशी असून वित्त आयोगातून कार्यकारी मंडळाला प्रचंड निधी मिळणार आहे. “अ’ वर्ग पालिकांना पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये मिळणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, पालिकेने नेमलेल्या समितीच्या सदस्यांचे पर्यावरण विषयाचे ज्ञान शून्य असल्याने या समितीला तज्ज्ञ निमंत्रितांवर अवलंबून रहावे लागणार आहे. नेहमी टक्केवारीची भाषा बोलणाऱ्या नगरसेवकांनी जैवविविधता समितीच्या रचनेत “खैंदूळ’ घातला होता. कार्यशाळा घेण्याची मागणी त्यांनी तावातावाने केली होती; परंतु या विषयाचे गांभीर्य ओसरल्यावर पुढे काय झाले, हे विचारायला एकही सदस्य फिरकला नाही.