बिबवेवाडी – आज विधानपरिषदेच्या अधिवशेनात पुणे शहरातील पाणी प्रश्न चांगलाच गाजला. पुणे शहरातील समान पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण व्हायचे आहे. महापालिकेमध्ये 34 गावांचा समावेश झाला आहे. शिक्षण आणि आयटी व्यवसायामुळे फ्लोटिंग पोपुलेशन मोठे आहे. शिवाय 20 टक्के पाणी गळती होते, अशा विविध मद्यांवर चर्चा करीत आमदार माधुरी मिसाळ यांनी पुण्याची पाणी समस्या सभापतींपुढे मांडली.
पुणे शहराला वीस टीएमसी पेक्षा जास्त पाणी मिळणे आवश्यक आहे. अतिरिक्त पाणी वापर केला म्हणून शासनाने दंड केला आहे. मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी द्यावे आणि भिलारेवाडी कात्रज येथे लघु पाटबंधारे यांनी आणि महापालिकेने सर्वेक्षण केले असून अर्धा टीएमसी पाणी पुणे शहराला उपलब्ध होऊ शकते, असेही आमदार मिसाळ यांनी निदर्शनास आणून दिले.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिरिक्त पाणी वापराबद्दल कायद्यानुसार दंड केला आहे. परंतु, या आधी तो वसूल केलेला नाही. मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घेण्याबाबत लवादाच्या निर्णयानुसार कार्यवाही करू भिलारेवाडी, कात्रज येथे अर्धा टीएमसी पाणी उपलब्ध होत असेल तर ते घेणे शक्य आहे का, यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभागाला तातडीने सर्वेक्षण करण्यास सांगून कार्यवाही करू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.