वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पाला लागणार आणखी वर्षभराचा कालावधी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाकडून मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रातंर्गत खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम तसेच जगताप डेअरी- साई चौक येथील उड्डाणपुलाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाल्हेकरवाडी येथील गृहप्रकल्प पूर्ण होण्यासाठी मात्र आणखी वर्षभराचा कालावधी लागणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
प्राधिकरणाकडून मोशी येथील 20 हेक्टर जागेत सध्या खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम सुरू आहे. या कामासाठी 21 फेब्रुवारीला 2019 रोजी कार्यादेश देण्यात आले. 20 मे 2020 पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी मुदत आहे. मात्र, चालू वर्षी डिसेंबरपर्यंतच हे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. कामासाठी एकूण 44 कोटी रुपयांचा खर्च मंजूर आहे. त्यापैकी आत्तापर्यंत 11 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
प्रकल्पाचे सुमारे 30 टक्के काम झाले आहे. जमिनीचे सपाटीकरण, 3 टॉयलेट ब्लॉक्स, रस्ते, लॅण्डस्केपींग आणि सुशोभिकरण आदी कामे केली जाणार आहेत. जगताप डेअरी-साई चौक येथील जगताप डेअरी आणि रक्षक चौक यांना जोडणारा उड्डाणपुल यापूर्वीच खुला झाला आहे. तर, जगताप डेअरी आणि काळेवाडी फाटा यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे. या पुलाचे 110 मीटर अंतरातील काम बाकी आहे. आत्तापर्यंत 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.
पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्पासाठी प्रतीक्षा –
पेठ क्रमांक 12 येथे गृहप्रकल्प-1 आणि गृहप्रकल्प-2 चे काम सध्या सुरू आहे. दोन्ही प्रकल्पांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकूण 3 हजार 317 तर, अल्प उत्पन्न गटाच्या नागरिकांसाठी एकूण 1 हजार 566 घरे उभारली जाणार आहेत. प्रकल्प एकसाठी 240 कोटी तर, प्रकल्प दोनसाठी 217 कोटी रुपये खर्च होणार आहे. प्रकल्प एकचे आत्तापर्यंत 3 टक्के तर, प्रकल्प दोनचे साडेचार टक्के काम पूर्ण झाले आहे. 7 मार्चला दोन्ही प्रकल्पांचे काम सुरू झाले. 6 मार्च 2021 पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी मुदत आहे.
वाल्हेकरवाडी गृहयोजनेचे काम संथगतीने –
वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक 30 व 32 येथे होणाऱ्या गृहयोजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. आत्तापर्यंत 30 टक्केच काम पूर्ण झाले आहे. गृहप्रकल्पाच्या कामासाठी 7 जानेवारी 2016 ला कामाचे आदेश दिलेले आहेत. काम पूर्ण करण्यासाठी 6 जुलैपर्यंतच मुदत होती. मात्र, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने कामासाठी नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. प्रकल्पाचे काम संथ गतीने पुढे सरकत असल्याने प्रकल्पाच्या कंत्राटदाराला सध्या दररोज दहा हजार रुपये दंड सुरू आहे. कंत्राटदाराकडून 72 लाख रुपये दंडापोटी वसुल केले आहेत.