प्रभात ऑनलाइन – एफएएने टेराफुगिया ट्रान्झिशनला ‘स्पेशल लाईट स्पोर्ट-एअरक्राफ्ट एअरवर्थनेस’ प्रमाणपत्र दिले आहे. एजन्सीच्या या प्रमाणपत्रानंतर आता या कारला उड्डाणासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
मॅसेच्युसेट्स स्थित टेराफुगिया या चिनी कंपनीने प्रमाणपत्र मिळवल्यावर सांगितले की, “हा एक महत्त्वाचा टप्पा आहे”, आता काही कालावधीत हे वाहन आकाशात आणि रस्त्यावर दोन्ही ठिकाणी वापरले जाऊ शकते. टेराफुगिया चीनच्या मालकीच्या जिली या कंपनीने 2017 मध्ये विकत घेतले होते. या कंपनीकडे व्होल्वोचीही मालकी आहे.
या वाहनाची एक उड्डाण आवृत्ती वैमानिक आणि फ्लाईंग स्कुलसाठी उपलब्ध आहे. तथापि, प्रत्यक्ष वाहतुकीसाठी सुमारे एक वर्ष लागू शकेल. या वाहनास अद्याप रस्ता सुरक्षा मानकांनुसार प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे. टेराफुगियाला आशा आहे की 2022 पर्यंत 2-सीटर हायब्रीड ग्राउंड-एअर वाहन मंजूर होईल आणि उत्पादन सुरू होईल.
कशी आहे ही फ्लाइंग कार?
टेराफुगिया ट्रान्झिशनला 100-एचपी रोटॅक्स 912 आयएस स्पोर्ट फ्युएल-इंजेक्टेड दिले आहे. हे वाहन ताशी 161 किलोमीटर वेगाने 10,000 फूट उंचीवरुन उड्डाण करू शकते तर रस्त्यावर सुमारे 400 मैल (644 किलोमीटर) अंतर व्यापू शकते. विमानाचे इंजिन प्रीमियम पेट्रोल किंवा 100LL विमानाच्या इंधनावर चालू शकते. तर हायब्रीड-इलेक्ट्रिक मोटर्स कार चालविण्यासाठी वापरली जातात.
या वाहनामध्ये स्टँडर्ड फीचर्स म्हणून चार-चाकी हायड्रॉलिक डिस्क ब्रेक, एक कठीण कार्बन फायबर सेफ्टी केज आणि एक एअरफ्रेम पॅराशूट दिले आहे. या वाहनाचे वजन सुमारे 1,300 पौंड (590 किलो) आहे आणि त्यात फिक्स्ड लँडिंग गिअर आहे. त्याच वेळी, त्याचे पंख 27 फूट रुंद आहेत. या वाहनाचे पंख मुडपून चारचाकीची जागा असणार्या गॅरेजमध्ये सहजपणे पार्क देखील करता येते.
उबर, किट्टी हॉक, बीएमडब्ल्यू आणि इतर कंपन्यांद्वारे तयार केली जाणारी फ्लाइंग कार प्रोटोटाइपपेक्षा ही ट्रान्झिशन कार वेगळी आहे. कारण या कंपन्यांच्या उड्डाण करणाऱ्या कार व्यावसायिक हवाई जागेचा वापर करतील. टेराफुगिया कंपनी म्हणते की, त्यांच्या फ्लाइंग कारला फ्लाइंग मोडपासून ड्राईव्हिंग मोडमध्ये फक्त एका मिनिटात स्विच केले जाऊ शकते.
एका रिपोर्टनुसार, 2018 मध्ये या ट्रान्झिशनच्या 2 सीटर मॉडेलची किंमत 4,00,000 डॉलर (सुमारे 2 कोटी 91 लाख रुपये) होती. आता 2022 मध्ये, कंपनी आपले हायब्रीड ग्राउंड एअर (भू-हवाई) वाहन बाजारात आणणार असून त्यानंतर त्याची किंमत जाहीर केली जाईल.
टेराफुगिया विविध प्रकारच्या उडणाऱ्या मोटारी बनवित आहे. कंपनीच्या इतर मॉडेल्समध्ये 4-सीटर टीएफ-एक्सचा समावेश आहे, जो एक हायब्रिड इलेक्ट्रिक वर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग (ईव्हीटीओएल) वाहन असेल. टीएफ-एक्स एक सेमी ऑटोनॉमस फ्लाईंग कार असेल जिला कम्प्युटर नियंत्रण दिले जाईल. यात प्रवासी थेट त्यांचे गंतव्यस्थान टाइप करू शकतील. हवाई वाहतूक, खराब हवामान आणि प्रतिबंधित एअरस्पेस टाळत वाहन आपोआप आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकेल.