पुणे – मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी असल्याने फ्लॉवर, कोबी आणि सिमला मिरची वगळता सर्वच फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. तर मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने कोबी, फ्लॉवर आणि सिमला मिरचीच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे.
हलव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या राजस्थानी गाजराचा हंगाम सुरू झाला आहे. रविवारी मार्केट यार्डात एक ट्रक गाजराची आवक झाल्याचे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले.
रविवारी येथील बाजारात 90 ते 100 गाड्यांची आवक झाली. परराज्यांतून आलेल्या मालामध्ये इंदौर येथून 4 टेम्पो गाजर, कर्नाटक, गुजरात येथून 4 ते 5 टेम्पो कोबी, कर्नाटक येथून 2 टेम्पो टोमेटो, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथुन 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, तामिळनाडू येथून 2 टेम्पो शेवगा, सिमला येथून 40 गोणी मटार, तर, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून 7 ते 8 ट्रक लसूणाची आवक झाली.
स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1500 ते 1600 गोणी, कोबी सुमारे 4 ते 5 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, टोमॅटो 6 ते 7 हजार पेटी, भुईमूग शेंग सुमारे 60 ते 70 गोणी, घेवडा 3 ते 4 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, गाजर 200 गोणी, कांद्यामध्ये जुना 30 ट्रक, तर नवीन कांद्याची 100 ते 125 गोणी, आंग्रा, इंदौर आणि स्थानिक मिळून बटाट्याची 30 ट्रक आवक झाली.