वर्धनगडमध्ये फुलतेय जिरेनियम शेती

प्रकाश राजेघाटगे

पुसेगाव – खटावसारख्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल अशी सुगंधी व औषधी वनस्पती जिरेनियमची शेती करण्याकडे शेतकरी वळला आहे. निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल व लहरीपणामुळे खरीप, रब्बी हंगामातील पिकांची जोपासना करताना बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. कोणतेही पीक शेतात लावल्यापासून ते हातात येई पर्यंत शेतकऱ्यांना खात्री राहिली नाही. त्यामुळे सातत्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करण्याची क्षमता शेतकऱ्यांकडे उरली नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा कमी कष्ट, जादा नफा मिळवून देणाऱ्या आधुनिक शेती करण्याकडे शेतकरी वर्ग वळताना दिसत आहे.

सुगंधी व औषधी वनस्पती जिरेनियमची शेती करण्यासाठी साधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान या वनस्पतीची लागवड केली जाते. वास्तविक पाहता 25 ते 30 डिग्री तापमानात या वनस्पतीची वाढ जोमाने होत असल्याने फेब्रुवारीत लागवड केल्यास चांगला फायदा होतो. या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्षे उत्पादन मिळते. एका एकरमध्ये 10 हजार रोपे लागतात. आणि हे पिक एका वर्षात तीन वेळा कापणीला येते. एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार रुपये येतो. इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये 75 टक्के कमी खर्च आहे. एक एकर उसाला जेवढे पाणी लागेल तेवढ्या पाण्यावर चार एकर जिरेनियमची शेती होऊ शकते. या वनस्पतीच्या शेतात आंतरपिक म्हणून शेवगा पीक उत्तम असते.

या शेवग्याच्या उत्पादनावर लागवडीचा खर्च निघून जातो. जिरेनियमपासून तेलनिर्मिती केली जात. कापणीनंतर उरलेल्या पालापाचोळ्यापासून खतनिर्मिती केली जाते. एका एकरात तीस ते चाळीस किलो तेल वर्षाला मिळते. जाग्यावर एक लिटर तेलाची किंमत 12 हजार 500 रुपये मिळते. म्हणजे एक एकरात एका वर्षात चार ते पाच लाख रुपये किमतीचे तेल शेतकऱ्यांना मिळते. त्याचा हायडेनसिपरफ्यूम व कॉस्मेटिकसाठी वापर केला जातो.

या तेलामुळे परफ्युममध्ये नैसर्गिक घटक मिळते. म्हणून जिरेनियमशिवाय पर्याय नाही. या वनस्पतीच्या तेलाची भारतात दर वर्षाला 200 ते 300 टनाची गरज आहे. पण सद्यस्थिती पाहता भारतात वर्षाला दहा टनही तेलनिर्मिती होत नाही. त्यामुळे या आणि अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड जास्तीतजास्त क्षेत्रात होणे अधिक फायदेशीर ठरणारे आहे. अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमीच आहे. गवतवर्गीय पीक असल्याने त्याला औषध व इतर खर्च फारच कमी प्रमाणात होतो. त्यामुळे आता पारंपारिक शेतीपेक्षा शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल आहे.

कांदा, बटाटा, आले, ऊस अशी नगदी पिके ही बिनभरवशाची आहेत, प्रचंड खर्च करून फायदा होईल का नाही हे शेवटपर्यंत शेतकऱ्यांना समजत नाही. त्यामुळे कमी कष्ट व जादा नफा मिळवून देणारी व हमखास शेतकऱ्यांच्या दारात लक्ष्मी आणणारी सुगंधी व औषधी जिरेनियमची शेती शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टीने निश्‍चितच सक्षम करेल.
विश्‍वनाथ पवार
(निवृत्त सुभेदार, जिरेनियम शेती उत्पादक, पवारवाडी, वर्धनगड, ता. खटाव)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.