पुणे – मार्केट यार्डात फुलांची साधारण आवक होत आहे. गेल्या आठवड्यात काही दिवस आवक घटल्याने भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली होती. फुलांना चांगले भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुले बाजारात आणण्यास सुरुवात केली.
त्यामुळे, भावात घसरण होऊन फुलांचे घटलेले भाव पूर्वपदावर आलेले आहेत. अधिक मास सुरू असल्याने फुलांना मागणी कमी प्रमाणात होत आहे. राज्य सरकारने सोमवारपासून (दि. 4) रेस्टॉरंट खुली करण्यास परवानगी दिली आहे.
त्यामुळे, कटफ्लॉवरच्या मागणीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी अनुराज कामठे यांनी सांगितले. तसेच, शहरासह राज्यातील अन्य मंदिरे उघडल्यास फुलांच्या मागणीत वाढ होईल. त्यानंतर भावात सुधारणा होईल, अशी शक्यताही यावेळी वर्तविण्यात आली.