अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणेश मंदीरास फुलांचा साज

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी म्हणजेच आज स्वराभिषेक, गणेशयाग यांसह धार्मिक विधी पार पडणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

आज पहाटे 4 ते 6 या वेळेत स्वराभिषेकांतर्गत प्रख्यात गायक अमोल पटवर्धन यांची गायनसेवा झाली तर सकाळी 8 ते दुपारी 12 यावेळेत गणेशयाग होणार आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिराला विविधरंगी फुलांची सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. तसेच अभिषेक, गणेश याग यांसह विविध धार्मिक विधी देखील मंदिरात पार पडणार आहेत. भाविकांसाठी मंगळवारी पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, यंदाच्या वर्षभरात ही एकच अंगारकी चतुर्थी असल्यामुळे भाविकांनीदेखील बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.