अन्य दोन युवकांचीही घेतली होती मदत; प्रौढ मानूनच केली जाणार कायदेशीर कारवाई
मियामी – गेल्या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध व्यक्तींच्या ट्विटर अकाउंट हॅक करून जगभरातील शेकडो लोकांची तब्बल 1 लाख डॉलरची बिटकॉईनद्वारे फसवणूक करण्यामागे 17 वर्षीय युवक हा मास्टरमाईंड असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याव्यतिरिक्त अन्य दोघाजणांवरही या गैरव्यवहारप्रकरणी आरोप आहेत.
ग्राहम इयान क्लार्क असे 17 वर्षाच्या किशोरवयीन युवकाचे नाव आहे. त्याला शुक्रवारी टांपा येथे अटक करण्यात आली. हिल्सबरो स्टेट ऍटर्नीकडून त्याला प्रौढ मानूनच त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्याच्यावर गंभीर गुन्ह्याचे 30 आरोप ठेवण्यात आलेले आहेत. त्याला मदत करणाऱ्यांमध्ये ब्रिटनमधील बोग्नोर रेगिस येथील 19 वर्षीय मेसन शेपार्ड आणि ओरलॅन्डो येथील 22 वर्षीय निमा फाझेली या दोघांवर कॅलिफोर्निया न्यायालयामध्ये स्वतंत्र आरोप ठेवण्यात आले आहेत.
या सनसनाटी पसरवणाऱ्या प्रकरणामध्ये 15 जुलै रोजी प्रसिद्ध राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजकांच्या ट्विटर अकाउंटवरून फेक मेसेज पोस्ट केले गेले होते आणि एका बिटकॉईन अकाउंटवर निधी पाठवण्याचे आवाहन या फेक मेसेजद्वारे करण्यात आले होते. या जमा झालेल्या निधीच्या दुप्पट परतावा देण्याचे फसवे आश्वासनही या मेसेजमध्ये दिले गेले होते.
बराक ओबामा, जो बिडेन, माईक ब्लूमबर्ग आणि ऍमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस आणि टेस्ला सीईओ ईयोन मस्क. सेलिब्रिटी केएन वेस्ट व त्यांच्या पत्नी किम कार्दाशियन आदींचे अकाउंट हॅक झाले होते.