केरविले (टेक्सास, अमेरिका) – टेक्सास हिल कंट्रीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराचे संकट निर्माण झाले आहे. या पुरात किमान २० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये २० मुलींचा समावेश आहे. उन्हाळी शिबिरासाठी या मुली जमल्या होत्या. हरवलेली मुले हंट या छोट्या शहरात ग्वाडालुपे नदीकाठी असलेल्या कॅम्प मिस्टिक या ख्रिश्चन छावणीत शिकत होती.
पुराच्या पाण्यात या मुली वाहून गेल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी हेलिकॉप्टर आणि बोटींद्वारे शोध मोहिम राबवली जाते आहे. शाळकरी मुली पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींच्या शोधासाठी प्रशासनाकडे तातडीने हालचाली करण्याची मागणी केली आहे.
मध्य केर काउंटीमध्ये रात्री किमान १० इंच पाऊस पडला. त्यामुळे ग्वाडालुपे नदीला अचानक पूर आला. या पुरात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २३७ जणांना वाचवण्यात आले आहे. त्यातील १६७ जणांना हेलिकॉप्टरने वाचवण्यात आले आहे, असे शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत केर काउंटी शेरीफ लॅरी लेथा यांनी सांगितले.
कॅम्प मिस्टिकमध्ये उपस्थित असलेल्या सुमारे ७५० मुलींपैकी सुमारे २३ मुली बेपत्ता होत्या. अजूनही काही जण बेपत्ता असण्याची शक्यता आहे. मात्र त्यांचा तपशील आताच सागंता येऊ शकणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
परिस्थिती अजूनही बिकट होत चालली आहे आणि मृतांचा आकडा बदलू शकतो, बेपत्ता झालेल्यांची एकूण संख्या निश्चित करण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व मृतांची ओळख पटवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
२ तासात पाणी पातळी २२ फुटांनी वाढली
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी पावसाची शक्यता आहे. किमान ३०,००० लोकांसाठी रात्रीच्या वेळी पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. परंतु काही ठिकाणी एकूण पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त होता. हंट येथील नदीच्या पाण्याच्या पातळीत सुमारे दोन तासांत २२ फूट वाढ नोंदवली गेली, असे नॅशनल वेदर सर्व्हिसच्या ऑस्टिन/सॅन अँटोनियो कार्यालयातील हवामानशास्त्रज्ञ बॉब फोगार्टी यांनी म्हटले आहे.
साडे २९ फूट पातळी नोंदवल्यानंतर पाण्याची पातळी मोजणे अशक्य झाले. मदत करण्यासाठी किमान ४०० लोक घटनास्थळी जमले आहेत. नऊ बचाव पथके, १४ हेलिकॉप्टर आणि १२ ड्रोन वापरण्यात येत आहेत. तर काही लोकांना झाडांवरून वाचवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.