काठमांडू : नेपाळमधील पूरस्थिती गंभीर बनली असून मृतांचा आकडा आता 217 झाला आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तींची संख्या देखील 28 इतकी झाली आहे. तर 143 जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे गुरुवारपासून नेपाळमधील अनेक प्रांतात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हजारो जणांना विस्थापित व्हावे लागले आहे.
देशाच्या पूर्व आणि मध्य भागातली पूरस्थिती तुलनेने अधिक गंभीर आहे. मात्र काठमांडू परिसरात मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली होती, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते ऋषिराम तिवारी यांनी सांगितले. मरण पावणाऱ्यांमध्ये काठमांडू खोऱ्यातील आकडा सर्वात जास्त 50 इतका आहे. नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांचे 20 हजार कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
बेपत्ता झालेल्यांचा शोध आणि मदतकार्याला सरकारने प्राधान्य दिले आहे. त्या जोडीने मदत साहित्याचे वाटपही केले जाते आहे. भुस्खलनामुळे महामार्गांवरची वाहतूक विस्कळीत झाली असून हे महामार्ग खुले करण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. दरडी कोसळल्यामुळे अनेक घरे गाडली गेली आहेत आणि पूल वाहून गेले आहेत. रस्ते बंद झाल्यामुळे हजारो प्रवासी विविध ठिकाणी अजूनही खोळंबले आहेत.