कोल्हापूरला जलप्रलय; पंचगंगेची पातळी धोक्‍याच्या पातळीवर 13 फूटांवर

कोल्हापूर  – कोल्हापुरात पावसाने हाहाकार उडविला आहे. तीन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाला क्षणभराचीही उसंत नाही. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील नाल्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे.

पंचगंगा नदी व जयंती नाल्याचा पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. विविध भागातील शेकडो कुटुंब सुरक्षितस्थळी स्थलांतर करत आहेत. शाळा, सभागृहे, समाजमंदिर या ठिकाणी संबंधित लोकांची व्यवस्था केली आहे. सध्या पंचगंगा नदी धोक्‍याच्या पातळीच्या वरती जवळपास 13 फूट वाहत आहे.

महापालिका, जिल्हा प्रशासन, प्रशासकीय यंत्रणा,बचाव कार्यातील टीम पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्नांची शर्थ करत आहे. शहरातील बाजारपेठेत पाणी शिरले आहे. शाहूपुरी सहावी गल्ली येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या पंचवीस नागरिकांना बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. टायटन शोरुम पासून फोर्ड कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आहे.

व्हिनस कॉर्नर परिरातील मोठया प्रमाणात पुराचे पाणी पसरले आहे. यामुळे दसरा चौक ते स्टेशन रोड,दाभोलकर चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. बसंत बहार टॉकीजसमोरील रस्ता बंद आहे.

शाहूपुरी, लक्ष्मीपुरी कामगार चाळ, व्हीनस कॉर्नर, सुतारवाडा, सिद्धार्थनगर, कदमवाडी, बापट कॅम्प, मुक्तसैनिक वसाहत, दुधाळी, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, रमणमळा, जाधववाडी अशा विविध ठिकाणी नागरी वस्तीत पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. यंदाच्या महापुरामुळे 2005 आणि 2019 मधील महापुरासारखी भीषणता जाणवू लागली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.