टोकियो – संततधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे जपानमध्ये आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण जपानमध्ये बेपत्ता असलेल्या आणखी अनेकांचा शोध सुरू आहे. एका वृद्धाश्रमाला पूराचा फटका बसला आहे. त्यामुळे किमान डझनभर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पूरामुळे अनेक घरे, इमारतींची पडझड झाली आहे. त्यामुळे शेकडो जण बेघर झाले आहेत.
पूरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मदत आणि बचाव पथकाचे कार्यकर्ते कुमान्मोटो भागात बोटींमधून नागरिकांची मदत करत आहेत. या मदतीसाठी तब्बल 40 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात केले गेले आहेत. त्यामध्ये कोस्टगार्ड आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कुमा नदीच्या खोऱ्यातील मोठा भाग पूराने वेढलेला आहे.
अनेक घरे, इमारती आणि वाहनेही पूराच्या पाण्याखाली गेली आहेत. अनेक बैठी घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. भूस्खलनामुळे अनेक घरे चिखलामध्ये गाडली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांना घरांच्या छतावर आश्रय घ्यावा लागला आहे. अशी छतावर आश्रय घेतलेले अनेक जण मदतीसाठी कपडे हालवून बचाव पथकाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेताना दिसत आहेत.
कुमा गावातील एका वृद्धाश्रमात पूराचे पाणी घुसल्याने किमान 14 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात अहे. शनिवार आणि रविवारीही येथील बचाव आणि मदतीचे काम सुरू होते. सेन्जुएन येथील पूराच्या पाण्यामध्ये वाहत आलेली अनेक वाहने अडकली आहेत. या भागात अडकलेल्या 51 जणांना बोटींमधून सोडवण्यात आले आणि उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका नर्सिंग होममधील 18 जणांचा पूरात मृत्यू झाला आहे. तर अजून 14 जण बेपत्ता आहेत. अजूनही डाझनभर पूरातच अडकलेले आहेत. हितोयोशी शहरामध्ये पूराचे पाणी अत्यंत वेगाने दुसऱ्या मजल्यापर्यंत वाढले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पोहून किंवा बोटीतून हलवण्यात आले. तर काही जण छतांवर जाऊन बसले आहेत.
कुमामोटोमधील पूर रविवारी ओसरला आहे. त्यामुळे चिखलात रुतलेल्या अनेक गाड्या दिसायला लागल्या आहेत. या भागातील सुमारे 2 लाख नागरिकांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून शुक्रवारी आणि शनिवारीच हलवण्यात आले होते. मात्र ही खबरदारी अनिवार्य नसल्यामुळे आणि करोनाच्या संसर्गाची भीती असल्याने अनेक जण आपापल्या घरातच रहिले होते. स्थलांतरित नागरिकांसाठी मदत छावण्यांमध्ये पूर्ण सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पूरामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला अहे.
जपानमध्ये तासाला 100 मिलीमीटर (4 इंच) इतक पाऊस झाला आहे. जपानच्या हवामान विभागाने या पावसामुळे भूस्खलन होण्याचा धोकाही वर्तवला आहे. आणखी काही दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.