पुरामुळे श्रीलंकेत जनजीवन विस्कळीत; 4 नागरिक दगावले, अनेक बेपत्ता

कोलंबो – श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे लोकांना पुराचा सामना करावा लागत आहे. पुरामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेकजण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. दोन लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे कोलंबो विमानतळावर उतरणारी ६ उड्डाणे वळवावी लागली आहेत. सध्याच्या घडीला बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या उच्च दबावाच्या पट्ट्यामुळे श्रीलंकेत मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांत 75 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सतत पाऊस पडत असूनही उच्च दाबाचे क्षेत्र कायम आहे. तसेच देशभरात जोरदार वारे वाहत आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पाऊस हळूहळू उत्तर-पश्चिम दिशेने सरकत असून भविष्यात त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते.
मदत आणि बचावासाठी लष्कर तैनात –
श्रीलंका सरकारने पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कर आणि नौदल तैनात केले आहे. लष्कराचे जवान पूरग्रस्तांना अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. दुसरीकडे, अम्पारा जिल्ह्यात मंगळवारी बेपत्ता झालेल्या 6 पैकी 2 विद्यार्थ्यांचे मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत. बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांचे वय १२ ते १६ वर्षांच्या दरम्यान होते. ते ज्या ट्रॅक्टर-ट्रॉलीने जात होते ते पुराच्या पाण्यात वाहून गेले. मात्र, ट्रॅक्टर चालकासह अन्य ५ विद्यार्थी घटनास्थळावरून बचावले. याशिवाय पावसामुळे डोंगराळ भागातही रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.
पूरग्रस्तांना मदत छावण्यांमध्ये पाठवले-
श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या म्हणण्यानुसार, पुरामुळे सुमारे ३ हजार कुटुंबांतील १० हजारांहून अधिक लोकांना आपले घर सोडावे लागले आहे. त्यांना १०४ मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. नॅशनल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने (एनबीआरआय) देशातील ९ प्रांतांमध्ये भूस्खलनाचा इशारा दिला आहे. एनबीआरआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, गेल्या २४ तासांत ७५ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास दरड कोसळण्याचा धोका वाढणार आहे. केलनी नदीच्या आसपासच्या भागातही सरकारने पुराचा इशारा दिला आहे. शुक्रवारपर्यंत हा इशारा देण्यात आला आहे.





