डिजिटलायजेशनच्या नावाखाली पूररेषेचा गळा घोटला?

पूररेषा बदलल्याचा स्वयंसेवी संस्थांचा आरोप : “एनजीटी’च्या निर्णयावरही घेतले आक्षेप

पुणे – महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या मुठा नदीची निळी आणि लाल पूर रेषा डिजिटलायजेशनच्या नावाखाली मनमानी पद्धतीने बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे सुधारित नकाशे पाटबंधारे विभागाने कोणत्याही सर्वेक्षणाचा आधार न घेता तयार केले होते. तेच शासनास देऊन त्याचा महापालिकेच्या विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्राच्या बाजूला भविष्यात आणखी बांधकामे वाढून भविष्यात या पेक्षाही अधिक मोठ्या पुरांचा शहराला धोका निर्माण झाल्याची भीती पर्यावरण अभ्यासक सारंग यादवडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली.

आरोप नेमका काय?
यादवडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटबंधारे विभागाने 2011 मध्ये नदीचे सर्वेक्षण करून पूररेषेचे नकाशे तयार केले होते. ते महापालिकेस दिल्यानंतर त्यांचा समावेश विकास आराखड्यात करणे आवश्‍यक होते. मात्र, या नकाशांबाबत न्यायालयीन वाद निर्माण झाल्याने या नकाशांचा समावेश न करताच विकास आराखडा शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आला. या आराखड्यात नकाशे घेतले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर यादवडकर यांनी राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) या प्रकरणाबाबत तक्रार केली होती.

यावर सुनावणी सुरू असतानाच सहा महिन्यांपूर्वी पाटबंधारे विभागाने पूर रेषेचे डिजिटल नकाशे जाहीर केले. त्यात, 2011 मधील पूर रेषा लक्षणीयरित्या बदलण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, ऍड. असीम सरोदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यावेळी उपस्थित होते.

“एनजीटी’च्या आदेशानंतर तीन वेळा महापालिकेस याबाबत पत्र देऊन आमची बाजू समजून घेण्याची विनंती केली असताना, पालिकेकडून एकदाही त्याला प्रतिसाद देण्यात आला नाही.
– सारंग यादवडकर, याचिकाकर्ता


या पूर रेषेविरोधात यादवडकर आणि वेलणकर यांनी “एनजीटी’मध्ये याचिका दाखल केली होती. मात्र, याचिकाकर्त्यांनी पुन्हा महापालिकेकडे जावे, असा आदेश “एनजीटी’ने दिला आहे. त्यामुळे हा निर्णय पूर्णत: चुकीचा आहे.
– ऍड. असीम सरोदे, वकील

येथे बदलली पूररेषा
* विठ्ठलवाडी येथील जुनी पूररेषा काही ठराविक घरांवर येत होती. ती त्यापेक्षा दुप्पट ते तीनपट घरांवर दर्शविण्यात आली. त्याच वेळी राजारामपूलाच्या आसपास असलेली पूररेषा पूर्णत: नदीच्या बाजूला सरकविण्यात आली.
* लकडीपूल ते शिवाजी पुलापर्यंत पूररेषेत बदल करण्यात आला. या ठिकाणी निळी पूररेषा 2011 च्या पूर रेषेपेक्षा 64 मीटर अलीकडे, तर लाल पूर रेषा तब्बल 81 मीटर अलीकडे घेण्यात आली.
* संपूर्ण संभाजी उद्यान निळ्या पूररेषेत होते. मात्र, आता तर ते पूर्णत: लाल रेषेबाहेर गेले आहे.
* संगमवाडी येथे ज्या ठिकाणी नदीपात्रात भराव टाकून अतिक्रमण करण्यात आले आहे. त्या भागात नागमोडी वळणे देऊन हा अतिक्रमण करण्यात आलेला भाग निळ्या पूररेषेबाहेर नेण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.