पावसाचा जोर वाढला! कोल्हापूर-सांगलीला पुराचा धोका; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जारी

मुंबई – अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीतही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दोन दिवसांपासून सतत एकसारखा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीतील धोक्‍याची पातळी पार करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दोन बंधारे आणि एक पूलदेखील पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर शिराळा तालुक्‍यातील आणखी दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 59 बंधारे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराचा धोका वाढताना दिसत आहे. कोल्हापूरातील राधानगरी धरणातून देखील 1100 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तर काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे.

कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर गेली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जारी केला असून प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रचंड पूर आला होता. यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे हा धोका लक्षात घेऊन प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा आपत्कालीन विभागाने दिला आहे.

दुसरीकडे कोयना पाणलोट क्षेत्रातही मागील दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कोयना धरणात आणि नदीपात्रातही पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.